कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत राजकीय उलथापालथ होऊ लागली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, काँग्रेसचे संतोष केणे आणि शिंदे गटाचे माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, योगेश म्हात्रे, कल्याण उपशहरप्रमुख संजय गायकवाड यांसह अनेक उल्हासनगर, टिटवाळा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
डोंबिवली जिमखाना येथे रविवारी (ता. ९) मोठ्या थाटामाटात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह व्यक्त करत शक्तिप्रदर्शन केले. दीपेश म्हात्रे म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीत विकासाची गाडी वेगाने धावावी, यासाठी भाजप सक्षम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विश्वास मला वाटतो.
म्हात्रे यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहेच, शिवाय शिंदे गटातदेखील अस्वस्थतता पसरली आहे. कल्याण-डोंबिवलीत परिसरात म्हात्रे कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता, भाजपला स्थानिक पातळीवर संघटन विस्ताराचा फायदा होणार आहे.
ग्रामीण भागातील काँग्रेसला धक्का
काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केणे यांनीही भाजपचा झेंडा हातात घेतला. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष, स्थानिक नेतृत्वाकडून होत नसलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षप्रवेशावर केणे म्हणाले, विकास आणि काम करण्याची संधी मिळावी, म्हणून मी भाजपमध्ये आलो. आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणे, हेच प्राधान्य असेल. केणे यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र राहुल आणि प्रणव केणे यांनीदेखील प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने कल्याण ग्रामीण भागातील काँग्रेसच्या संघटनाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
महापालिका जिंकण्यासाठी रणनीती
कल्याण लोकसभा क्षेत्राचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांतील नाराज नेत्यांशी संपर्क साधला होता. आजच्या प्रवेशामुळे चव्हाण यांची ‘कल्याण-डोंबिवली महापालिका जिंकण्याची रणनीती’ स्पष्ट दिसून आली. चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले, कल्याण-डोंबिवलीचा विकास हा एकच अजेंडा आहे. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे संघटन अधिक मजबूत होईल.
भाजपची ताकद वाढली
आगामी पालिका निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. एकीकडे भाजपकडे वाढत चाललेली ताकद आणि दुसरीकडे विरोधकांची गळती येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये याचा नक्कीच प्रभाव जाणवत राहील.

