अंबरनाथमध्ये शिवसेनेमध्येच अंतर्गत संघर्ष

अंबरनाथमध्ये शिवसेनेमध्येच अंतर्गत संघर्ष

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : वेळ कधीच एकसारखी राहात नाही. काल तुम्ही ज्यांची अडवणूक केली, ते आज त्याचा वचपा काढणारच... अशीच काहीशी कुजबूज सध्या अंबरनाथमध्ये ऐकायला मिळत आहे. याला निमित्त ठरले आहे, शिवसेना शिंदे गट अंतर्गत असलेल्या संघर्षाचे. विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. बालाजी किणीकर विरुद्ध माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या विस्तव जात नसल्याचे नाट्य अनेकांनी अनुभवले. त्याचा दुसरा अंक आता नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या वेळीही वरिष्ठांची शिष्टाई कामाला येणार का, हे पाहावे लागणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी विजयाची हॅट्‌ट्रिक मारली. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार घाम फोडत असताना शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक ज्येष्ठ नेते अरविंद वाळेकर यांची असहकाराची भूमिका खूप चर्चेत होती. या वेळी किणीकर विरुद्ध वाळेकर वाद उफाळून आल्याचे चित्र होते. वास्तविक वाळेकर हे अंबरनाथमधील जुने नेतृत्व असून, त्यांच्या भूमिकेची दखल घेतली जाते. त्यामुळे त्यांना दुखावून निवडणूक पार पाडता येणार नाही, याची खात्री झाल्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नमतेपणा घेतला. वाळेकर यांचे वर्चस्व असललेल्या शाखेत जाऊन शेकडो शिवसैनिकांसमोर किणीकर यांनी शरणागती पत्करली, पण दोन्ही नेत्यांच्या कार्यकत्यांमध्ये वाद इतके टोकाचे आहेत, की त्या वेळी पक्ष नेतृत्वाने समज दिल्यानंतरही ते संपले नाहीत. या घटना आता इतिहास जमा झाल्या असल्या तरी त्याची खपली कधीही निघण्याची शक्यता आहे.

आता नगर परिषद निवडणुकीत आमदार डॉ. किणीकर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे वाळेकर बॅकफूटवर गेल्याचे दिसते. याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमातील वाळेकरांच्या वक्तव्यातून येतो. पक्षांतर्गत कोणताही संघर्ष नसून आमची विकासासाठी स्पर्धा असल्याची सावरासावर वाळेकरांनी केली, पण आमदार डॉ. बालाजी किणीकर झाले गेले, सर्व विसरून जातील का, हा प्रश्न आहे.

युतीची शक्यता धूसर
अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती होण्याची शक्यता धूसर आहे. हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधात लढल्यास पुन्हा सत्ता आणण्यासाठी शिवसेनेला पूर्ण ताकद लावावी लागेल. त्यासाठी अंतर्गत हेवेदावे पक्ष नेतृत्वाकडून खपवले जाणार नाहीत, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com