नवा पादचारी पूल समस्येच्या गर्तेत ; मनसेचा आंदोलनाचा इशारा

नवा पादचारी पूल समस्येच्या गर्तेत ; मनसेचा आंदोलनाचा इशारा

Published on

नवा पादचारी पूल समस्येच्या गर्तेत
प्रवासी गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यता
धारावी, ता. ८ (बातमीदार) : सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल नूतनीकरणासाठी बंद झाल्याने पादचाऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वे आणि पालिका प्रशासनाने नवीन पादचारी पूल उभा केला आहे. धारावीतून सायनच्या स्वामी श्री वल्लभदास मार्गावर उतरणारा हा पूल पादचाऱ्यांसाठी सोयीचा ठरला असला तरी, अनेक समस्यांनी ग्रासला आहे.
धारावीतील लक्ष्मी बाग विभागात जिथे हा पूल उतरतो, त्या ठिकाणी वाहने पार्किंग केलेली असल्याने आणि रस्ता अरुंद असल्याने मोठी गर्दी उसळत आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. वाहतूक पूल बंद असल्याने अवर लेडी, साधना, धर्मप्रकाश, पी.डब्ल्यू.एस. यांसारख्या विविध शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी पुलावर व पुलाखाली होत आहे. पुलावर विजेचे दिवे नसल्याने सायंकाळी पूर्णपणे अंधार असतो. यामुळे महिला, मुली आणि लहान मुलांना भीती वाटत असून, असामाजिक घटकांकडून छेडछाडीच्या घटना घडण्याची भीती ज्येष्ठ समाजसेवक शंकर संटी यांनी व्यक्त केली आहे.

आंदोलनाचा इशारा
या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) धारावी पोलिस ठाणे आणि वाहतूक विभागाला पत्रव्यवहार केला आहे. लक्ष्मी बाग परिसरातील अनधिकृत पार्किंगवर कायदेशीर कारवाई करावी आणि पादचाऱ्यांचा त्रास दूर करावा, अशी मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश सोनवणे, उपविभाग अध्यक्ष नितीन दिवेकर, उपविभाग सचिव संदीप कवडे, शाखा अध्यक्ष संदीप कदम यांनी केली आहे. जर अधिकाऱ्यांनी या समस्येची योग्य ती दखल घेतली नाही, तर मनसे त्यांच्या ‘स्टाइलने’ आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com