पालिकेचे नागरी समस्येकडे दुर्लक्ष
पालिकेचे नागरी समस्येकडे दुर्लक्ष
गटारे, फूटपाथवरील झाकणे गायब; अपघाताचा धोका वाढला!
वसई, ता. ९ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्ते, गटारे आणि फूटपाथांची दुरुस्ती केली असली तरी, त्यांच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गटारावरील आणि फूटपाथवरील झाकणे गायब किंवा तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हे मार्ग रोजच्या प्रवासात अपघाताचे ठिकाण ठरत आहेत.
वसई-विरार महापालिकेवर गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. सर्व कारभार प्रशासनाकडे असून, नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. रस्त्यांवरील खड्डे, तुटलेली झाकणे, गटारांमधून ओसंडणारी घाण आणि दुर्गंधी यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात वसईत एका महिलेसह एका गाईचा गटारात पडून जखमी होण्याचा प्रकार घडला होता. प्रसंगावधान दाखविणाऱ्या नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्वरित झाकणांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. प्रभाग समिती ‘एच’सह नालासोपारा, विरार, नवघर, माणिकपूर, वसई इत्यादी प्रभागांतील अनेक ठिकाणी गटारे तुटलेले, झाकणे गायब आहेत. नागरिकांनी सांगितले की, शाळकरी मुले, चाकरमानी, तसेच ज्येष्ठ नागरिक हे पायी प्रवास करताना धोका पत्करतात. शिवाय भटक्या जनावरांचा वावरही वाढल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
................
घाण, दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न
गटारांची साफसफाई केल्यानंतर निघणारा गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेला अनेक दिवस पडून राहतो. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते आणि नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
................
गटारावरील झाकण नसल्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. वसई-विरार महापालिका अपघात होण्याची वाट पाहत आहे का? बांधकाम विभागाने त्वरित पाहणी करून गटारे व फूटपाथ सुरक्षित करावेत, असे भाजपचे वसई रोड मंडळाचे अध्यक्ष महेश सरवणकर यांनी सांगितले, तर शहरातील नादुरुस्त गटारे आणि फूटपाथांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील. त्वरित कार्यवाही केली जाईल, असे वसई-विरार महापालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले.
....................

