‘कोकण साहित्य भूषण’ पुरस्काराने प्रवीण दवणे सन्मानित
‘कोकण साहित्य भूषण’ पुरस्काराने प्रवीण दवणे सन्मानित
कासा, ता. ९ (बातमीदार) ः कोकण मराठी साहित्य परिषदेचा (कोमसाप) सर्वाधिक प्रतिष्ठेचा ‘कोकण साहित्य भूषण’ पुरस्कार २०२३-२४ साठी डहाणू येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि संस्कृतिकर्मी प्रवीण नारायण दवणे यांना प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार समारंभ रत्नागिरीच्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात ७ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात कोमसापचे विश्वस्त तथा ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रवीण दवणे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सन्मानाने संपूर्ण डहाणू परिसरासह कोकणातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली. या सोहळ्याला कोमसाप विश्वस्त एल. बी. पाटील, केंद्रीय अध्यक्ष नमिता किर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, स्मारक समिती अध्यक्ष गजानन पाटील, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, सहकार्यवाह दीपा ठाणेकर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मयेकर, तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शेलार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मोहन भोईर यांसह विविध जिल्ह्यांतील साहित्यिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण दवणे यांनी कोकणातील साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली अनेक दशके सातत्याने कार्य केले आहे. त्यांनी ग्रामीण जीवन, कोकणी मातीची संवेदना आणि सामाजिक बदल यांना आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडले. त्यांचे लेखन केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून ते समाजजागृतीचे साधन बनले आहे. त्यांच्या या बहुआयामी योगदानाची दखल घेत कोमसापने त्यांना ‘कोकण साहित्य भूषण’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले.

