ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश

Published on

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते केला प्रवेश
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दीपेश म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटाचे माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे, शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रे, युवसेना कल्याण जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे, कॉंग्रेसचे संतोष केणे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संतोष तरे, कल्याण पुर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक देवानंद गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख संजय गायकवाड, मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख संदीप सामंत, शाखा प्रमुख मनोज वैद्य, उपविभागप्रमुख अरविंद मानकर, उपशाखा प्रमुख राजू सावंत आदींसह इतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची मेगा भरती पार पडली.
डोंबिवलीतील जिमखाना मैदानात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी ते म्हणाले, माझ्या विरोधात असलेले चांगले युवा नेते दीपेश म्हात्रे आता भाजपमध्ये आले आहेत. महापालिकेला पारदर्शक महापौर देण्याचा मुहूर्त ठरला आहे. हा महापौर महायुतीचा असेल, मात्र नक्की कुणाचा, याचा उलगडा योग्य वेळी होईल. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक नेतृत्व देऊ. त्यांनी लवकरच आणखी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूचक वक्तव्य केले.

लोकहित साधण्यासाठी भाजपमध्ये ः म्हात्रे
दीपेश म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी प्रवेश केला. लोकांना न्याय देण्यासाठी आणि विकासाची कामे करण्यासाठी सत्तेच्या आणि निर्णय घेणाऱ्या टेबलवर असणे गरजेचे आहे. या वेळी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका करत ते म्हणाले, ठाकरे गटात खालच्या नेतृत्वाची काम करण्याची पद्धत, जुने आणि नवीन यांच्यातला फरक करण्याची पद्धत याला सर्वजण कंटाळले आहेत आणि गळचेपीदेखील होत होती. लोकहित साधण्यासाठी आम्ही भाजपमध्ये आलो, असे त्यांनी सांगितले.

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचाही प्रवेश
या कार्यक्रमात शिंदे सेनेचे काही प्रमुख कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुले पत्र देत म्हटले की, भाजपने आघाडीच्या तत्त्वांना तिलांजली देत आपला खरा चेहरा दाखवला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनीदेखील संयम दाखवू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com