आम्हीसुद्धा युतीसाठी आग्रही भूमिकेत
आम्हीसुद्धा युतीसाठी आग्रही भूमिकेत
कपिल पाटील यांचे सूतोवाच!
बदलापूर, ता. १० (बातमीदार) : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची निवडणूक प्रमुख म्हणून नुकतीच निवड केली आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर कपिल पाटील यांनी शनिवारी (ता. ८) बदलापुरात ८० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारसुद्धा शिवसेनेसोबत (शिंदे गट) युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शक्य तिथे युती करण्याच्या सूचनांवर काम केले जाईल. पुढे कपिल पाटील यांनी सांगितले, की ते लवकरच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा करणार आहेत. स्थानिक शिवसेना शहरप्रमुखांशी (शिंदे गट) चर्चा झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. कुळगाव बदलापूर नगर परिषदेसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
गेल्या काही महिन्यांत भाजप आमदार किसन कथोरे आणि शिंदे गटाचे शहरप्रमुख यांच्यात मतभेद असल्याने दोघांनीही एकमेकांना स्वबळावर लढण्याचे आव्हान दिले होते. आमदार किसन कथोरे यांनी अचानक महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती जाहीर केली होती. त्या वेळी शिवसेनेला (शिंदे गट) विचारात घेतले नव्हते. त्यानंतर कथोरे यांनी आम्ही शिवसेनेसोबतही युती करण्यास तयार असल्याचे जाहीर केले. मात्र त्या वेळी शिंदे सेनेकडून या युतीबाबत नकारात्मकता दर्शविण्यात आली होती. त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी तर ठाणे जिल्हा ग्रामीणमधील निवडणुकांसाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली.
इच्छुकांशी संवाद
शनिवारी कपिल पाटील यांनी बदलापुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. या संवादात भाजपचे इच्छुक उमेदवार शिंदे गटासोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसून आल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार शक्य तिथे युती करण्याच्या सूचनांवर काम केले जाईल. याबाबत स्थानिक शिवसेना शहरप्रमुख यांच्याशी चर्चा झाली असून, उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे.
युती सर्वांच्याच फायद्याची
१० वर्षांनंतर होणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये युतीत लढणे सर्वांसाठीच सोयीचे होणार आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांकडून प्रचार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे युती झाल्यास त्यात माघार कोण घेईल, हा मोठा प्रश्न आहे. येत्या काळात बदलापूर महापालिका होण्याची शक्यता आहे. अशा वेळी ही शेवटची नगरपालिका निवडणूक असेल. कारण काही वर्षांत जनगणना झाल्यानंतर बदलापूर शहरात महापालिकेची घोषणा होईलच. त्यामुळे सध्या सर्वांनाच नगरसेवक म्हणून सभागृहात जाण्याची इच्छा आहे. मात्र युती झाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची अनेकांनी तयारी दाखवली आहे. काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

