डोंबिवलीत राजकीय पलटवार
डोंबिवलीत राजकीय पलटवार
भाजप-शिंदे गटात फोडाफोडीचे राजकारण सुरू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस यांसह शिंदे गटाला रविवारी (ता. ९) भाजपने धक्का देत माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचले. दीपेश म्हात्रे यांचा पक्षप्रवेश हा ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाच्या जास्त जिव्हारी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे गटाने भाजपच्या विकास म्हात्रे यांसह तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश करीत पलटवार केल्याचे दिसून आले. रात्री उशिरा ठाण्यात हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत, अशा आणाभाका सुरुवातीला दोन्ही पक्षांकडून घेण्यात आल्या होत्या; मात्र याला तडा गेला असून भाजप आणि शिंदे गटात फोडाफोडीचे राजकारण पेटू लागले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका ही शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी डोंबिवलीवर संघाचा पगडा राहिला आहे. या वेळी शिवसेनेत फूट पडल्याने त्याचा फायदा भाजपा या निवडणुकीत उचलू पाहात आहे. शिवसेनेचा येथे प्रभाव असला तरी महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केडीएमसीतील सूत्रे ही पहिल्यापासून डोंबिवली पश्चिमेतून चालत आली आहेत. त्यामुळे येथील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गट व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच भाजपमधील नाराज विकास म्हात्रे यांची मनधरणी पक्षातील वरिष्ठांकडून केली जात नव्हती, त्यांना विकास निधी दिला जात नाही यावर ते अडून बसले होते. त्यामुळे ते कधीही पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. ठाकरे गटातदेखील जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्याविरोधात वातावरण तयार होऊ लागले होते. दरम्यान, म्हात्रे यांनी कल्याण- डोंबिवलीत विविध मोर्चे, आंदोलनांच्या माध्यमातून विरोधी गटाची भूमिका योग्य मांडत पक्षाला उभारी दिल्याने पक्षातील नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास होता; मात्र महापौर, आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या म्हात्रे यांना पक्षात हवी तशी संधी मिळाली नाही. पुढेही त्याची फारशी स्पष्टता नसल्याने त्यांनी भाजपची वाट धरल्याचे म्हटले जात आहे.
वर्चस्वाची लढाई
कल्याण डोंबिवली महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी डोंबिवलीवर संघाचा (भाजपचा) पगडा राहिला आहे. शिवसेनेत फूट पडल्याने भाजप या निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. केडीएमसीतील सूत्रे डोंबिवली पश्चिमेतून चालत आली आहेत. त्यामुळे येथील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही गटांत रस्सीखेच सुरू आहे. दिवसाची सुरुवात भाजपने शिंदे गटावर चाल करून केली, तर समाप्ती शिंदे गटाने भाजपला धक्का देत केली.
कल्याण-डोंबिवलीतील निवडणूक केवळ प्रचारावर नाही, तर संघटनेतील ‘शक्तिवान कोण?’ यावर अधिक अवलंबून आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
उशिरा पक्षप्रवेश
म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची वार्ता पसरताच शिंदे गटात सर्वाधिक खळबळ माजली, तर दुसरीकडे ठाकरे गटातून मात्र कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. रविवारी म्हात्रेंचा पक्षप्रवेश झाला त्या वेळी शिंदे गटातील माजी नगरसेविका पूजा म्हात्रे त्यांचे पती योगेश म्हात्रे यांसह टिटवाळा, उल्हासनगर येथील काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमस्थळी म्हात्रेंपेक्षा विकास म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा जास्त होती. विकास हे सायंकाळी शिंदे गटात प्रवेश करतील, हे तेथेच स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री शिंदे हे एका कार्यक्रमानिमित्त बाहेर होते. उशीर झाला असला तरी त्यांची वाट कार्यकर्ते बंगल्यावर पाहात होते. अखेर ११च्या सुमारास शिंदे गटाचा पक्षप्रवेश पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

