पक्षप्रवेशांची कुरघोडी
पक्षप्रवेशांची कुरघोडी
भाजप, शिवसेना शिंदे गटात स्पर्धा; महाविकास आघाडीला धक्के
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ठाण्यात सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. यामध्ये भाजप सर्वाधिक आक्रमक भुमिकेत दिसून येत असून ठाण्यात दबावतंत्र तर कल्याण डोंबिवलीपासून मुरबाडपर्यंत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. या कुरघोडीच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना शिंदे गट अधिक मजबूत होत असून महाविका आघाडीची फळी मात्र कमकूवत होत आहे.
अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत सुरू झाली आहे. तर दुसरीकडे ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी (ता. ११) निघणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापण्यास सुरुवात झाली आहे. नगपरिषदांसाठी आधी स्वबळ आणि आता महायुतीच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे जागावाटप खोळबंले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे येत्या काही दिवसांत कळेल. पण त्याआधी कल्याण डोंबिवलीत राजकीय भुकंपाचे हादरे बसू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने ठाकरे गटासह शिवसेना शिंदे गटालाही हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना शिंदे गटाला बगल देत म्हात्रे यांनी भविष्याची चिंता मिटवण्याठी भाजपच्या गोटात जाणे पसंत केले आहे. त्यांच्या सोबत १२ माजी नगरसेवकही गेल्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपची स्थिती मजबूत झाली आहे. गेल्या निवडणुकीत थोडक्यासाठी भाजपच्या हातातून सत्ता निसटली होती; यंदा मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली येथे कमळ फुलवण्याचा जोरदार प्रयत्न असणार आहे. हे एकप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न आहे.
भाजपची ताकद वाढली
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. पण विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकून एक पाऊल पुन्हा पुढे टाकले आहे. आता जिल्हा परिषदेपासून ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई या महापालिकांवरही भाजपला सत्ता हवी आहे. यापैकी मीरा भाईंदर, नवी मुंबई या दोन महापालिकांमध्ये अनुकूल वातावरण आहे. उल्हासनगरातही भाजप आजच्या घडीला मजबूत स्थितीत आहे. मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपला जोर लावावा लागणार आहे. याची धुरा वनमंत्री गणेश नाईक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यांवर सोपवली आहे. ठाण्यात शिंदे गटाकडे सध्याच्या घडीला ८५ माजी नगरसेवकांची फौज आहे. अशावेळी ५० पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी रणनिती आखली जात आहे. या पार्श्वभुमीवर कल्याण डोंबिवलीमधील पक्षप्रवेशांचा धडाका लावून भाजपने एकप्रकारे शिंदे गटावर कुरघोडी केली असल्याची चर्चा आहे.
शिंदेंचाही पलटवार
कल्याण-डोंबिवलीत भाजपची खेळी उलथवून लावण्यासाठी शिवसेना शिंदे गटही सक्रीय झाला आहे. आपले माजी नगरसेवक ताब्यात ठेवण्यासोबत त्यांनी आता आपला मोर्चा भाजप विरोधात उघडला आहे. ठाकरे गटाचे दिपेश म्हात्रे भाजपच्या गळाला लागल्यानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला सुरुंग लावत त्यांचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे, त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांचा पक्षप्रवेश पार पाडला. यावेळी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख साईनाथ तारे, नंदू धुळे, आदी पदाधिकार्यांनाही पक्ष प्रवेश देण्यात आला. त्याआधी भाजपचे कट्टर विरोधक असलेल्या महेश गाडकवाड यांचीही घरवापसी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

