रस्त्यावरील धूळ आणि साचलेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
धूळ, कचऱ्यामुळे विद्यार्थी हैराण
घाटकोपरच्या चिरागनगरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः घाटकोपरच्या चिरागनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, धूळ, कचऱ्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. रस्त्यावर खडी, खड्डे, साचलेला कचरा आणि त्यातून उडणारी धूळ यामुळे या परिसरातील दोन शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर बनले आहे. याच मार्गावर एक मस्जिददेखील असल्याने नमाजासाठी येणाऱ्या मुस्लिम नागरिकांनादेखील धूर आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरून वाहनांची सततची वर्दळ सुरू असते. त्यामुळे खडी आणि माती हवेत उडून धूर स्वरूपात पसरत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना वारंवार नाक दाबून चालावे लागत आहे. पालकांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही मुले उद्याचे भविष्य आहेत, त्यांच्या श्वासातच प्रदूषण भरले जात असेल, तर आरोग्यासाठी कोण जबाबदार, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात एन विभाग घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता किरणसिंग पाटील यांनी सांगितले की, या भागात दररोज कचरा उचलला जातो. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेकडून जनजागृतीही करण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वच्छता मोहीम सातत्याने सुरू आहे.
या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. खडी आणि धूळ यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळेजवळ कचरा कायम साचलेला असतो. पालिकेने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी आणि परिसर स्वच्छ करावा अन्यथा नागरिकांसह आम्ही तीव्र आंदोलन करू.
- कांचन बडे, समाजसेविका
या परिसरात दोन शाळा आहेत. विद्यार्थ्यांना रोज नाक दाबून शाळेत प्रवेश करावा लागतो. पालिकेचे उघड दुर्लक्ष्य होत आहे. विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही. रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन उभारले जाईल.
- राजेश पारखे,
जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष

