भूमिगत जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने
भूमिगत जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने
पाच एमएलडी क्षमतेचा प्रकल्प; कामोठेवासीयांना दिलासा
कामोठे, ता. ११ (बातमीदार) ः कामोठे नोडमधील कायमस्वरूपी पाणीटंचाईवर लवकरच तोडगा निघणार आहे. सिडकोकडून सेक्टर २१ येथे उभारण्यात येत असलेला पाच एमएलडी क्षमतेचा भूमिगत जलकुंभ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून, तो कार्यान्वित झाल्यानंतर कामोठे, जुई, नौपाडा परिसरातील तीन लाखांहून अधिक नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून कामोठे परिसरात अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा हा रहिवाशांच्या दैनंदिन जीवनातील गंभीर प्रश्न बनला आहे. टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने अनेकांना महिन्याला हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सिडकोने २०२० रोजी पाच एमएलडी क्षमतेचा भूमिगत जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. सुरुवातीला सुमारे नऊ कोटी रुपयांची तरतूद करून १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; परंतु नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प कागदावरच अडकून राहिला. यानंतर २०२३च्या अखेरीस सिडकोने नव्याने प्रकल्पाला गती दिली. या वेळी अंदाजे १६ कोटी रुपयांची तरतूद करून नव्या ठेकेदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीला २०२५च्या अखेरीपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पनवेल महापालिकेचे माजी आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत यांनी या प्रकल्पासाठी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. मागील अनेक वर्षे प्रकल्प रखडल्याने नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले. आता हा प्रकल्प पूर्णत्वाला जात असल्याने खऱ्या अर्थाने कामोठेकरांना दिलासा मिळेल. या प्रकल्पामुळे सेक्टर १६ ते २१ या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
..........
सिडकोचा विश्वास
सध्या काम जलदगतीने सुरू असून, नियोजित कालावधीत जलकुंभाचे बांधकाम पूर्ण होईल आणि कामोठेकरांना येत्या उन्हाळ्यापूर्वीच त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास सिडकोचे पाणीपुरवठा अभियंता प्रफुल्ल देवरे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

