धार्मिक स्थळे भिकाऱ्यांचे आश्रयस्थान
धार्मिक स्थळे भिकाऱ्यांचे आश्रयस्थान
प्रशासनासाठी ठरतेय डोकेदुखी; नागरिकांकडून कारवाईची मागणी
कामोठे, ता. १० (बातमीदार) : पनवेल महापालिका आणि परिसरातील धार्मिक स्थळे आता भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनू लागली आहेत. आठवड्याच्या ठरावीक वारानुसार मंदिर, मस्जिद, दर्गा, आणि इतर श्रद्धास्थळाबाहेर भिकाऱ्यांची गर्दी वाढत असून, भाविकांना प्रवेशद्वारापासूनच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आणि खांदा वसाहत या भागात धार्मिक ठिकाणी भिकाऱ्यांची उपस्थिती रोजचीच झाली आहे. सोमवारी शंकर मंदिर, मंगळवारी गणपती मंदिर, गुरुवारी साईबाबा मंदिर, शुक्रवारी मस्जिद आणि शनिवारी मारुती मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भिकारी दिसून येतात. काही ठिकाणी ही मुले आणि तरुण मिळालेल्या पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भिकाऱ्यांमध्ये परप्रांतीयांचे प्रमाण लक्षणीय असून, बालकांसह भीक मागणारे दृश्य सहज दिसते. काही मुले भाड्याने आणली जात असल्याची चर्चा असून, आर्थिक टंचाईमुळे असंघटित कामगारांची मुले या व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र आहे. भीक मागणे आणि लहान मुलांना भीक मागायला लावणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरीही स्थानिक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे या प्रवृत्तीवर अंकुश ठेवता येत नसल्याचे मान्य केले जाते. नागरिकांच्या मते, नियमित छापे आणि पुनर्वसन उपक्रम हाती घेतल्यास परिस्थिती सुधारू शकते. रायगड जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, भीक मागणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कोलाड येथे भिक्षेकरी गृह, कर्जत येथे शासकीय अनुदानित बालगृह, तर पनवेल आणि अलिबाग येथे स्वयंसेवी संस्थांचे बालगृह कार्यरत आहेत. तसेच रोहा आणि खारघर येथे मुलींसाठी स्वतंत्र निवासगृहे उपलब्ध आहेत.
....................
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात भिकाऱ्यांवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. कामगार आयुक्त कार्यालय व स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते. १०९८ हा चाइल्ड हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांक असून, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते, असे रायगड जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी सांगितले. तसेच भीक मागणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कोलाड येथे भिक्षेकरी गृह, कर्जत येथे शासकीय अनुदानित बालगृह, तर पनवेल आणि अलिबाग येथे स्वयंसेवी संस्थांचे बालगृह कार्यरत आहेत. तसेच रोहा आणि खारघर येथे मुलींसाठी स्वतंत्र निवासगृहे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

