श्वानाला लाथ मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण

श्वानाला लाथ मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण

Published on

श्वानाला लाथ मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण
त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : आपल्या पाळीव श्वानाला लाथ मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका त्रिकूटाने श्वानाच्या मालकासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. या घटनेत मारहाण करणाऱ्यांनी मोबाईल तोडून टाकला. तसेच तक्रारदाराच्या गळ्यातील सोन्याची साखळीही गहाळ झाली आहे.

वेदान्त येरम (२३, रा. टेकडी बंगला, ठाणे) हा शनिवारी (ता. ८) रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कचराळी तलाव परिसरात त्याचा मित्र यश जोरे यांच्यासह पाळीव श्वानाला घेऊन फिरत होता. त्या वेळी सिगारेट ओढत बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तींकडे श्वान गेला असता त्यांनी श्वानाला लाथ मारली. याचा वेदान्त यांनी जाब विचारताच दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार आणि त्याचा मित्र टेकडी बंगल्याकडे जाणाऱ्या चौकातील श्री साईबाबा मंदिरासमोर येताच ते दोघे पाठोपाठ आले आणि त्यांनी इतर मुलांना फोन करून बोलावले. त्रिकूटापैकी एकाने तक्रारदाराच्या डोक्यात कुडी मारली आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत वेदान्त यांचे डोके, चेहरा, डोळा, मान आणि ओठाला गंभीर मार लागून रक्तस्राव झाला. वेदान्त यांचा मित्र यश हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत असताना हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून रस्त्यावर आपटून फोडून टाकला आणि यशलाही मारहाण केली. या मारहाणीत तक्रारदाराच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीनंतर पीडित घरी गेले आणि कुटुंबीयांसोबत घटनास्थळी परत आले तेव्हा हल्लेखोर पळून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी (ता. ९) त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्या अनोळखी त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com