दादरमधील मच्छीमारांना मुलुंडला हलवणार?

दादरमधील मच्छीमारांना मुलुंडला हलवणार?

Published on

दादरमधील मच्छीमारांना मुलुंडला हलवणार?
स्थानिक रहिवासी, घाऊक विक्रेत्यांमधील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्‍न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सेनापती बापट मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि स्थानिक रहिवासी व घाऊक मच्छीविक्रेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा दादरमधील मच्छीमारांना मुलुंडमधील ऐरोली टोलनाका परिसरात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या ३६ मच्छीमारांना नोटीस पाठवली जाणार आहे, मात्र मच्छीमारांनी या हालचालीला तीव्र विरोध करण्याची तयारी सुरू केली आहे.
महापालिकेच्या बाजार विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मच्छीमारांना तात्पुरते ठिकाण म्हणून ऐरोली टोलनाका, मुलुंड येथे जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, मात्र अद्याप औपचारिक मान्यता मिळालेली नसल्याने नोटीस देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, मच्छीमारांनी महापालिकेच्या या हालचालीविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. दादरमधील हा भाग त्यांचा मुख्य व्यापार केंद्र असल्याने ते स्थलांतरास तयार नाहीत.
कांचन रुक्मिणी, या मच्छीविक्रेत्या म्हणाल्या, आम्हाला २०२१ मध्ये महापालिकेकडून अशीच नोटीस देण्यात आली होती. तेव्हा आम्ही उच्च न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने आम्हाला आमच्या सध्याच्या ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. आता पुन्हा हलवायचे कारणच नाही.
महापालिकेने मच्छीमारांना सांगितले आहे की, त्यांचा कायमस्वरूपी बाजार, महात्मा जोतिबा फुले मंडई परिसरात असून, तो अद्याप बांधकामाधीन आहे. तो एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मच्छीमारांना तात्पुरते मुलुंडमधील ठिकाण देण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार, ते दादमधील सध्याच्या ठिकाणीच विक्री सुरू ठेवणार आहेत. या निर्णयामुळे दादर परिसरातील वाहतूक, रहिवासी आणि मच्छीविक्रेते यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाहतूक कोंडीचा त्रास
दररोज पहाटे हे मच्छीमार ट्रक घेऊन सेनापती बापट मार्गावर येतात आणि सकाळी १०-१२ वाजेपर्यंत रस्त्यावरच मासळी विक्री सुरू असते. त्यामुळे या भागात भीषण वाहतूक कोंडी होते, असे ‘चकाचक दादर’ संस्थेचे संस्थापक चेतन कांबळे यांनी सांगितले. एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यापासून या भागातील वाहतूक समस्या अधिकच गंभीर झाली आहे. मच्छीविक्रेत्यांना पुन्हा रस्त्यावर विक्रीस परवानगी दिली जाईल, हे कळल्यावर आम्ही तीव्र विरोध केला आणि प्रशासनाकडे तक्रार केली, असे ते म्‍हणाले.

Marathi News Esakal
www.esakal.com