घणसोली सिम्प्लेक्स रहिवाशांचा आयुक्तांच्या दालनावर धडक

घणसोली सिम्प्लेक्स रहिवाशांचा आयुक्तांच्या दालनावर धडक

Published on

घणसोली सिम्प्लेक्स रहिवाशांची आयुक्तांच्या दालनावर धडक
पुनर्विकासातील विलंबाबद्दल प्रशासनाला जाब; तातडीने निर्णय घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : घणसोली सेक्टर ७ येथील सिम्प्लेक्स परिसरातील सात सोसायट्यांतील शेकडो रहिवाशांनी सोमवारी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनावर थेट धडक देत पुनर्विकासाच्या कामातील अकार्यक्षमतेबद्दल प्रशासनाला जाब विचारला. अनेक वर्षांपासून जीर्णावस्थेतील इमारतींमध्ये राहात असलेल्या रहिवाशांनी आपल्या जीवित आणि आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
२००४ रोजी सिडकोने बांधलेल्या सिम्प्लेक्स सोसायटीत प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे वास्तव्यास आहेत, मात्र गेल्या दोन दशकांत इमारतींची पडझड झपाट्याने झाल्याने रहिवाशांचे जीवनमान धोक्यात आले आहे. पावसाळ्यात भिंती गळणे, छताचे प्लास्टर कोसळणे, ओलसरपणा आणि सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे ३,२६४ कुटुंबांपैकी १,२०० हून अधिक कुटुंबांनी सुरक्षिततेच्या भीतीने घर सोडून इतरत्र स्थलांतर केले असून, उर्वरित नागरिक जीव मुठीत घेऊन या जीर्ण इमारतींमध्ये राहात आहेत.
रहिवाशांनी पुनर्विकासासाठी आयआयटी खरगपूर, व्हीजेटीआय यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. सर्व अहवालांमध्ये या इमारतींना मानवी वास्तव्यास अयोग्य आणि अतिधोकादायक, असे घोषित करण्यात आले आहे. या इमारती ‘शहरी नूतनीकरण क्लस्टर’मध्ये पात्र ठरतात, असेही स्पष्ट झाले. तरीदेखील नगररचना विभागाने पाहणी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, राजकीय दबावाखाली फाईली मुद्दाम थांबवण्यात येत आहेत आणि पुनर्विकासाची प्रक्रिया विलंबित केली जात आहे. यामुळे संतापलेल्या श्री गणेश कृपा, माउली कृपा, कै. शिवाजीराव पाटील, कै. आमदार अण्णासाहेब पाटील, श्री गुरुदेव दत्त, श्री हनुमान आणि ओम साई धाम या सात सोसायट्यांच्या नागरिकांनी पालिका आयुक्तांच्या दालनावर ठिय्या दिला. रहिवाशांनी प्रशासनाकडे पुनर्विकासासाठी तत्काळ मंजुरी देऊन स्ट्रक्चरल ऑडिटच्या निष्कर्षानुसार URC युआरसी पात्रतेचा अहवाल जारी करण्याची मागणी केली आहे. आम्ही आता केवळ आश्वासनांवर न राहता प्रत्यक्ष निर्णयाची मागणी करतो; अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा रहिवाशांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com