सोपारा खाडीवरील पुलामुळे द्रविडी प्राणायाम
विरार, ता. १० (बातमीदार) : नायगाव रेल्वे स्थानकात जाण्यासाठी सोपारा खाडीवरील लहान पूल पूर्वेकडील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या पुलाचे काम गेल्या ११ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची पंचाईत होत आहे. या पुलावरून नायगाव स्थानकात जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. या पुलाच्या माध्यमातून नागरिकांना रेल्वेस्थानकात पोहोचता यावे, या उद्देशाने २०१४मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. मात्र २०१८मध्ये मुख्य पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही २०२५ पर्यंत त्याचा पोहोच मार्ग अपूर्णच आहे. पूर्वी या ठिकाणी लाकडी पूल कार्यरत होता.
नायगाव पूर्वेला १२ गावे आणि छोटे पाडे अशी मोठी गावे आहेत. त्यांना नायगाव स्थानकात जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. पूर्वी या ठिकाणी लाकडाचा पूल होता. त्यानंतर नायगाव-भाईंदरदरम्यान नवा पूल १९८५मध्ये उभा करताना लोखंडी पूल उभा करण्यात आला होता. या खाडीवर छोटा पूल उभारण्याचे काम २०१४मध्ये हाती घेण्यात आले होते. त्यात अडथळे येऊन ते अर्धे काम २०१८मध्ये पूर्ण झाले. परंतु त्यानंतर या प्रकल्पाच्या विलंबामागील मुख्य कारण म्हणजे पोहोच मार्गासाठी लागणारी उमेळा सर्व्हे क्र. १२२ ही जमीन सरवई मिठागर व मीठ विभाग यांच्या वादात अडकली आहे. २०२२मध्ये या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सरकारी वकिलांनी हा आदेश रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला असला तरी ३० जून २०२३ नंतर त्यावर सुनावणी झालेली नाही. या विलंबामुळे पोहोच मार्गाचे बांधकाम थांबलेलेच आहे.
पालिकेकडून निधी
नायगाव खाडीपुलासाठी आतापर्यंत पाच कोटी खर्च झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सांगण्यात येत आहे. तसेच अंतिम टप्प्यातील पुलाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी वाढीव निधीची गरज लक्षात घेता महापालिकेमार्फत एक कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. या निधीतून पुलाचा पूर्वेकडील चढ-उतार मार्ग, मार्गांचे डांबरीकरण, रेलिंग व इतर कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. परंतु पश्चिमेकडील संपूर्ण उतार मार्गाचे काम बाकी राहिले आहे.
न्यायालयाची स्थगिती उठविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही सरकारकडे भूसंपादनासाठी पाच कोटींची मागणी केली आहे. ती मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. सरकारने पैसे दिल्यानंतर ते पैसे न्यायालयात जमा करून न्यायालयाकडून परवानगी घेऊन पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- संजय यादव, कार्यकारी उपअभियंता, बांधकाम विभाग
न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पुलाचे काम रखडले आहे. काम रखडल्याने नागरिकांना स्टेशनला जाण्यास त्रास होत आहे. अपूर्ण पुलावरून ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, दिव्यांगांना जाण्या-येण्याचा मोठा त्रास होत आहे.
- कन्हैया भोईर, माजी सभापती, वसई विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

