मुंबईची आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहराच्या दिशेने वाटचाल

मुंबईची आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहराच्या दिशेने वाटचाल

Published on

मुंबईची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराच्या दिशेने वाटचाल
‘सकाळ’ इन्फ्रा हाउसिंग कॉन्क्लेव्हमध्ये तज्ज्ञांचे मत

मुंबई, ता. १० : मेट्रो, कोस्टल रोड, मुंबई रिंग रोड, अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर इत्यादी पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे महाराष्ट्राच्या विकासाबरोबरच मुंबई हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होण्याकडे वाटचाल करीत आहे, असा विश्वास तज्ज्ञ, धोरणकर्त्यांनी साेमवारी ‘सकाळ’तर्फे आयोजित इन्फ्रा हाउसिंग कॉन्क्लेव्ह २०२५मध्ये व्‍यक्त केला. या वेळी भविष्यातील पायाभूत सुविधांचा राेडमॅप मांडण्यात आला.

परिषदेत आज उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, समूह-स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आदी सहभागी झाले होते. वाढवण बंदर निर्मिती, मुंबई-ठाणे परिसराला नवी मुंबई विमानतळ जोडणे तसेच नवी मुंबई विमानतळाच्या शेजारी क्रीडा, आयटी, शिक्षण केंद्रे यांचा हब तयार करणे, त्याचबरोबर मराठी माणसाला मुंबईतच टिकवून धरण्यासाठी धारावी पुनर्वसन, बीडीडी पुनर्विकास, अभ्युदयनगर पुनर्विकास असा सर्वंकष विकासाचा आराखडाच या वेळी मांडण्यात आला.

म्हाडा, सिडको यांसारख्या गृहनिर्माण यंत्रणांनी त्यांचे मोक्याचे भूखंड घरांसाठी दिले तर साऱ्या अडचणी दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी होस्टेल आणि नोकरदारांसाठी भाडेतत्त्वावरील घरे बांधावीत, अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. जिल्ह्यात होणारे बल्क ड्रग पार्क रायगडमध्येच होणार असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत कोठूनही कोठेही जाण्यास एक तास लागावा, अशी वाहतूक व्यवस्था पाच वर्षांत करावी. घराजवळ दोन ते पाच किलोमीटर अंतरात कार्यालये निर्माण करावीत. मुंबई-पुणे या शहरांमधील कर कमी करून राहणीमानाचा खर्च कमी करावा, अशा सूचना मंगलप्रभात लोढा यांनी केल्या.

अटल सेतू, पनवेलजवळ तसेच वाढवण बंदर परिसरात मोठी शहरे उभारून तेथे पायाभूत सुविधांचे वेगळे नियोजन सरकार करीत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार म्हणाले. पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यांची एकत्रित निर्मिती-नियोजन आवश्यक असून, नवी मुंबई विमानतळ, मेट्रो, रिंग रोड यामुळे गृहनिर्माणाला सहाय्य होत आहे. तसे नियोजन केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिजन मराठी माणसाला मुंबईतच टिकवायचे हे आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.


मुंबई-नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार
२०३६पर्यंत नवी मुंबई विमानतळाची वार्षिक प्रवासीक्षमता नऊ कोटींपर्यंत वाढेल. मुंबई आणि नवी मुंबई ही दाेन्ही विमानतळे मेट्रोने जोडण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई विमानतळावर येण्यासाठी लोकल ट्रेन, मेट्रो, वाॅटर ट्रान्सपोर्टच्या सुविधेचे नियोजन असल्याचे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी सांगितले.

मुंबई लवकरच वाहतूक काेंडीमुक्त!
सध्या मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोडची संकल्पना पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असल्याचे ‘एमएमआरडीए’चे आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. पूर्व मुक्त मार्गाच्या पुढे ऑरेंज गेट ते नरिमन पाॅइंटदरम्यान टनेलचे काम होणार आहे. त्यापुढे वरळीपर्यंत कोस्टल रोड आहे. वरळी-वांद्रे सी लिंक, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, उत्तन ते विरार असा मार्ग होणार आहे. भविष्यात वाढवण बंदर, विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉरला ताे जोडला जाऊ शकतो. मुक्त मार्ग ठाण्याच्या आनंदनगरपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. वरळी-शिवडी कनेक्टर, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, जेव्हीएलआर इत्यादी प्रकल्पांमुळे मुंबईची रिंग रोडची संकल्पना पूर्ण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com