नेतीवली मार्गावर फसले ओडिसी वाहन;
नेतीवली मार्गावर फसले ओडिसी वाहन
सकाळपर्यंत वाहतुकीचा उडाला बोजवारा
कल्याण, ता. ११ (बातमीदार) : नेतीवली परिसरातील वाहतूक मंगळवारी (ता.११) रात्री तीनपासून ठप्प झाली होती. नेतिवलीकडून पत्री पूल दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मेट्रो मॉलसमोर एक ओडिसी वाहन अडकले होते. हे वाहन सकाळपर्यंत रस्त्यावरच अडकल्याने पूर्वेकडील दोन्ही बाजूंकडील वाहतूक कोलमडून पडली. वाहतूक बंद झाल्याने चक्कीनाका, सुचकनाका आणि पत्री पूल परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर चार तासानंतर वाहतूक सेवा संथगतीने सुरळीत करण्यात आली.
नेतीवली परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आधीच रस्ता अरुंद असल्याने अडचण वाढली आहे. दुसरीकडे शहाड पूल दुरुस्तीकामी बंद असताना दुर्गाडी आणि गोविंदवाडी परिसरातही रस्त्यांची कामे सुरू असल्याने कल्याण पूर्वेचा संपूर्ण भाग ठप्प झाला. नेतीवली परिसरात मेट्रोच्या कामकाजासाठी उभारलेले पत्रे आणि रस्त्याकडेला असलेल्या झाडामुळे हे ओडिसी वाहन अडकून पडले होते. अखेर सकाळपर्यंत वाहन हळूहळू पाठीमागे सरकवून नेतीवली परिसरात उभे करण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पोलिसांनी दुसऱ्या मार्गिकेवरून वाहतूक हळूहळू मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वाहनचालकांनी अतिघाईत ओव्हरटेक करत विरुद्ध दिशेने वाहने नेल्याने कल्याणहून शिळफाट्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अडसर निर्माण केला. त्यामुळे नेतीवली पत्रिपुलाला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांची मात्र हा गुंता सोडवता सोडवता पुरती दमछाक उडाली होती. अखेर अनेक तासांच्या मशागतीनंतर वाहतूक सेवा संथगतीने सुरू झाली.
एकाच वेळी सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीवर ताण
शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे कल्याणकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच अंतर्गत रस्ते देखील अजूनही खड्डेमय आहेत. केवळ १५ मिनिटांचा प्रवास करण्यासही अर्धा ते एक तास लागल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
ओडिसी वाहन म्हणजे काय ?
ओडिसी वाहन म्हणजे ओवर डायमेंशन कन्साइनमेंट वाहन. हे असे अवजड किंवा मोठ्या मापमानाचे वाहन असते ज्याची लांबी, रुंदी किंवा उंची सामान्य वाहनांपेक्षा जास्त असते. अशा ओव्हर डायमेंशन वाहनांना वाहतूक नियमानुसार विशेष परवाना मिळतो कारण यांना रस्त्यांवर सुरक्षितपणे चालवण्यास अनेक नियमांचे पालन करावे लागते. ओडिसी वाहन चालवताना त्यास विशिष्ट मार्ग, वेगवाढ प्रतिबंध, चालण्याचा वेळ आणि अनेक वेळा सोबत सहाय्यक कर्मचारी ठेवण्याची गरज भासते. हे वाहन मालमत्ता, औद्योगिक यंत्रसामग्री किंवा इतर मोठ्या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरले जातात.
वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरच या वाहनाला सोडण्यात येईल. दुसऱ्या मार्गिकेवरून एक एक करून वाहतूक हळूहळू सुरू केली होती. परंतु, अतिघाईत ओव्हरटेक करून काही वाहनचालकांनी पूर्ण वाहतूक कोलमडून टाकली होती. अशा बेशिस्त वाहनचालकां विरोधातही आम्ही गुन्हे दाखल करीत असतो.
- सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक
इतकी मोठी वाहने शहरात येतात कशी? अवजड वाहन चालकांची अधिकाऱ्यांशी हातमिळवणी झालेली असते. अधिकारी दिवसाआड पैसे घेऊन गाड्या सोडतात. ही अवजड वाहने रस्त्याकडेला असलेल्या झाडांचीही प्रचंड नासधूस करतात. मात्र, प्रशासन कानाडोळा करून आहे.
- हरेश इंगळे, स्थानिक रहिवाशी, नेतीवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

