रोटरी सेवा महिना ठाण्यात होणार साजरा..

रोटरी सेवा महिना ठाण्यात होणार साजरा..

Published on

रोटरी सेवा महिना ठाण्यात होणार साजरा
हेरिटेज प्रकल्प, नोकरी मेळावे व सामाजिक उपक्रमांची रेलचेल
ठाणे, ता. ११ (बातमीदार) : रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून यंदा रोटरी सेवा महिना साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (ता. १५) ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार असल्याची माहिती रोटरी इंटरनॅशनलचे जिल्हा गव्हर्नर हर्ष मकोल यांनी दिली.
या महिन्याच्या उपक्रमांतर्गत ठाण्यातील ३६ रोटरी क्लब सहभागी होत असून, हेरिटेज प्रकल्पावर विशेष भर दिला जाणार आहे. किल्ले, जुनी वारसा स्थळे व प्राचीन वास्तूंची स्वच्छता, माहिती व संवर्धनावर लक्ष केंद्रित केले जाईल. ठाकुर्ली, कोपरी खाडी आणि इतर भागांत या प्रकल्पांतर्गत ऐतिहासिक स्थळांची माहिती नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या उपक्रमातून हेरिटेज रन मॅरेथॉन आयोजित करून पुढील सामाजिक उपक्रमांसाठी निधी संकलन करण्यात येणार आहे.

नोकरी मेळावे
याशिवाय ठाणे, कल्याण, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडी येथे नोकरी मेळावे आणि आभा कार्ड योजनेबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यात नवी मुंबईत ६० कंपन्यांच्या सहभागाने रोजगार मेळावा होणार असून, ठाण्यातील विविध क्लबकडून पाच ते १० ठिकाणी नोकरी मेळावे घेण्यात येतील. कल्याणमध्ये चेक डॅम बांधणी, थॅलेसिमिया जनजागृती व रक्तदान शिबिरे आणि महिला सक्षमीकरण प्रकल्पही राबवले जात आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com