घरातील मोलकरिणीनी केले घर साफ
हिरानंदानी इस्टेटमध्ये घरफोडी
दोन लाखांचे दागिने गायब ः घरकाम करणाऱ्या महिलांवर संशय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : घरातील तिजोरीमधून तब्बल दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घरातील काम करणाऱ्या महिलांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरानंदानी इस्टेट येथे राहणारे विकास कुमार (४६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरामध्ये चोवीस तास घरकाम करणाऱ्या ६० वर्षीय महिला असून त्या त्यांच्याच घरात राहतात. घराच्या साफसफाईकरता वाघबीळमधील १८ आणि १९ वर्षीय तरुणी काम करत आहेत. घरातील सर्व किंमती वस्तू, सोन्याचे दागिने व पैसे हे त्यांच्या वडिलांच्या लाकडी कपाटामधील तिजोरीमध्ये असतात. परंतु, तिजोरीचे लॉक खराब झाल्यामुळे वडिलांनी लाकडी कपाटाला बाहेरून कडीकोंयडा लावून त्यास लोखंडी लॉक लावले आहे. ६ नोव्हेंबर रोजी विकास कुमार यांनी वडिलांकडे बँकचे कामकाजाकरीता पासबुक मागितले. त्यावेळी कपाटातील दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निर्दशनास आले. ते दागिने घरात काम करणाऱ्या मोलकरिणीनी नेले असल्याचा संशय तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

