ठाणे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच
ठाणे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर!
मेटल डिटेक्टर, स्कॅनर मशीनचा स्थानकात अभाव; दिल्लीतील स्फोटानंतरही दुर्लक्ष
पंकज रोडेकर/ सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर, ऐतिहासिक आणि प्रचंड वर्दळ असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकातील सुरक्षाव्यवस्था अगदी कमकुवत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानकात सुरक्षा भिंत, मेटल डिटेक्टर तसेच स्कॅनर मशीन या सुरक्षा उपकरणांचा अभाव असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या स्थानकात विकासाची कामे सुरू असतानाही सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून केला जात आहे. त्यांनी सुरक्षेला तातडीने प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.
ऐतिहासिक ठाणे स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी ये-जा करतात. येथे मध्य आणि हार्बर लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांची सेवाही दिवसरात्र सुरू असते. पश्चिम आणि पूर्वेकडून स्थानकात येण्या-जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. वाढलेल्या पुलांमुळे थेट स्थानकात एन्ट्री आणि एक्झिट करणे सोपे झाले आहे; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षा भिंत नसल्यामुळे मध्यंतरी फलाट क्रमांक दोनवर चक्क रिक्षा शिरल्याची घटना घडली होती. शिवाय भिकारी आणि गर्दुल्लेही स्थानकात खुलेआम वावरताना दिसतात.
सुरक्षा उपकरणे गायब
मध्यंतरी फलाट क्रमांक दोन आणि १० येथे बसवलेले मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर मशीन अचानक गायब झाले आहेत. याबाबत कोणालाही काही माहिती नसल्याचा सूर सुरक्षा यंत्रणांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. ठाणे लोहमार्ग पोलिस दलाकडे असलेल्या तोकड्या मनुष्यबळावरच स्थानकाच्या सुरक्षेचा गाडा हाकला जात असून, त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे.
दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर खबरदारी घेणे आवश्यक आहे; मात्र स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. ना सुरक्षा भिंत, ना मेटल डिटेक्टर, ना स्कॅनर मशीन. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले आहे. या घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था
स्थानकात सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर मशीन बसविण्याबाबत वारंवार रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. नुकतेच स्मरणपत्रही दिले आहे. तसेच नव्याने रुजू झालेल्या ठाणे रेल्वेस्थानक प्रबंधकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी सुरक्षेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलिस ठाणे

