प्रभाग सोडतीचा प्रस्थापितांना फटका
नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका निवडणुकीचे पडघम आता अधिकृतपणे वाजण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीकडे अनेकांचे डोळे लागले होते. अखेर आगामी निवडणुकीसाठी २९ प्रभागांसाठी ११५ सदस्यांचे आरक्षण मंगळवारी (ता. ११) जाहीर झाले. आरक्षण सोडतीमध्ये महिला आरक्षण आणि महिला राखीव जागेचा फटका सर्वसाधारण पुरुषांना बसला आहे. ५८ जागांवर महिलांचे राज येणार आहे. त्यामुळे प्रस्थापितांना चांगलाच फटका बसला आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत महापालिका कार्यालयात मंगळवारी ही सोडत पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सोडत प्रक्रिया दुपारी २ वाजता संपली. विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रत्येक प्रभागाची चिठ्ठी आणि सोडत पद्धत्तीने ही प्रक्रिया पार पडली. या सोडतीत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच जागा आरक्षित झाल्या. त्यापैकी तीन जागा या प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पाच जागा राखीव झाल्या. त्यापैकी तीन जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गासाठी ३१ जागा आरक्षित झाल्या. त्यातील आणि यातील १६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात ७४ जागा आरक्षित झाल्या असून, ३६ जागा या प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
११५ पैकी ५८ जागा आरक्षणनिहाय महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षण सोडतीवेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, उपायुक्त स्वाती देशपांडे, अजित मुठे यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी या सोडतीचे कामकाज पाहिले. या वेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
महिला उमेदवारांसाठी तारेवरची कसरत
१६ प्रभागांमध्ये केवळ एकच जागा सर्वसाधारण आहे, तर २० क्रमांकाच्या प्रभागात सर्व एकत्रित आरक्षण पडल्याने सर्वसाधारण गटाला येथे संधी मिळणे कठीण आहे. महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण गटात नगरसेवक बनण्यासाठी पुरुषांची मोठी स्पर्धा पाहायला मिळणार असून, अनेकांचा हिरमोड होणार आहे. अनेक पक्षांना सक्षम महिला उमेदवार शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
१० वर्षांनंतर निवडणूक
महापालिकेसाठी सुमारे १० वर्षांपूर्वी निवडणूक झाली होती. त्यानंतर २८ जून २०२० रोजी महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल साडेपाच वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातून चालविला जात आहे. आता या निवडणुकीमध्ये अनेकांनी नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहिले आहे. आता महापालिका आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची उमेदवारीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
प्रभाग २० मध्ये सर्वच महिला
प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वसाधारण पुरुषाला जागाच नाही. अ जागा अनुसूचित प्रवर्ग, ब जागा अनुसूचित जमाती, तर उर्वरित दोन्ही जागा महिलांसाठी आहेत. त्यामुळे या प्रभागात सर्वसाधारण पुरुष उमेदवाराला एकही जागा शिल्लक नाही. परिणामी या प्रभागात तयारी केलेल्या सर्वसाधारण पुरुषांना आता उमेदवारीसाठी दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
२०११ नुसार लोकसंख्या : १२,३४,६९०
अनुसूचित जाती : ५१,४६८
अनुसूचित जमाती : ५८,६०८
लोकसंख्येचा लेखाजोखा
चार सदस्य प्रभागांची सरासरी : ४२,९४६
सर्वाधिक मतदार : ४७,२४१
सर्वात कमी मतदार : ३८,६५१
तीन सदस्य प्रभागांची सरासरी : ३२,२०९
सर्वाधिक मतदार : ३५,४३०
सर्वात कमी मतदार : २८,९८८
पालिका सदस्यांची आरक्षण सोडत
प्रवर्ग जागा महिलांसाठी
सर्वसाधारण ७४ ३६
नागरिकांचा मागास प्रवर्ग ३१ १६
अनुसूचित जाती ५ ३
अनुसूचित जमाती ५ ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

