रेल्वे ट्रॅकवरून जीवघेणा प्रवास सुरुच!
रेल्वे ट्रॅकवरून जीवघेणा प्रवास सुरुच!
सँडहर्स्ट रोड घटनेनंतरही प्रशासन जागं नाही; टिटवाळा, आंबिवली, शहाड येथे ट्रॅकवरच नागरिकांची वर्दळ
टिटवाळा, ता. ११ (वार्ताहर) : नुकताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे लाईनवरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकानजीक परिसरात काही प्रवाशांचा रेल्वे रुळावरून चालक असताना मृत्यू झाला होता. पण, या अपघातानंतरही रेल्वे प्रशासन आणि आरपीएफ विभाग अजूनही जागे झालेले दिसत नाहीत. टिटवाळा, आंबिवली, शहाड या स्थानकांवर दररोज प्रवास रेल्वे रुळ ओलांडत आहेत. शॉर्टकट म्हणून थेट रुळावरून चालत जात आहेत आणि काही ठिकाणी तर रेल्वे रुळांचा शौचालयासाठी वापर केला जातो. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून या गंभीर प्रकारावर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. प्रवाशांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवण्याऐवजी रेल्वे अधिकारी केवळ अपघातानंतर घटनास्थळी येऊन पाणी ओतण्याचे काम करताना दिसतात, अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे प्रशासन कधी जागे होईल?
आंबिवली स्थानक परिसरात तर हा प्रकार रोजच्या दिनचर्येचा भाग झालेला आहे. काही जण थेट रुळावर उतरून विरुद्ध दिशेच्या ट्रेनकडे धाव घेतात. काहींना ट्रेन सुटण्याची भीती असल्याने ते प्लॅटफॉर्मवरील पायऱ्या न वापरता थेट रेल्वे रुळ ओलांडतात. सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीत हा प्रकार अधिक वाढतो. काही ठिकाणी रेल्वे रुळाच्या बाजूला असलेली गंजलेली फेंसिंग मोडून प्रवाशांनी स्वतःसाठी शॉर्टकट तयार केला आहे. यामुळे सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
रेल्वे रुळांवर सतत गस्त ठेवण्याची जबाबदारी रेल्वे पोलिस आणि आरपीएफ विभागावर आहे. मात्र. वास्तव वेगळंच दिसतं. अपघात घडल्यानंतरच हे अधिकारी घटनास्थळी पोहोचतात, चौकशी करून परत निघून जातात. रेल्वे रुळावर लोकं चालताना रोज दिसतात. पण त्यांना कोणी अडवत नाही. अपघात झाल्यावर मात्र सगळे धावत येतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
उपाययोजना कधी अंमलात येणार?
रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई सुरू केली पाहिजे. रेल्वे रुळ परिसरात संरक्षण भिंत, फेंसिंग आणि पथदीप यांसारख्या सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. स्थानकांच्या परिसरात सार्वजनिक शौचालयांचीही सोय नसल्याने काही लोक ट्रॅकवरच बसतात. हा प्रकार थांबवण्यासाठी स्वच्छता मोहिमेसोबत जनजागृती मोहीमेची आवश्यकता असल्याचेही प्रवाशांनी म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

