घरातील ‘मंडळी’ निवडणुकीच्या मैदानात

घरातील ‘मंडळी’ निवडणुकीच्या मैदानात

Published on

घरातील ‘मंडळी’ निवडणुकीच्या मैदानात
आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का, दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : महापालिकेच्या निवडणुकीकरिता आज जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रस्थापित काही नगरसेवकांना धक्का बसला आहे, तर काही नगरसेवकांवर मागासवर्गीय आणि महिला आरक्षणामुळे दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. चार सदस्यांच्या एका प्रभागामुळे नगरसेवकांकडून घरातील सूनबाईंना मैदानात उतरवण्याची खेळी खेळली जाणार आहे.
जानेवारीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीकरिता वाशीतील महापालिकेच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. १११ जागांकरिता २८ प्रभाग पडले आहेत. यात २७ प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा जाहीर झाला. २८ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती महिला व पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष, अनुसूचित जमाती महिला व पुरुष, सर्वसाधारण महिला व पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे प्रस्थापित नगरसेवकांना घरातील महिलांना राजकारणात आणावे लागणार आहे.
---------------------
प्रभाग क्रमांक ४ - गवते कुटुंबीयांनी तयारी केली आहे. चिंचपाडा हा प्रभाग माजी नगरसेविका अपर्णा, दीपा गवते यांचा असल्यामुळे माजी नगरसेवक नवीन गवते तयारी करीत आहेत. त्यांचा सामना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक ६ - माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागात सोनवणे यांना सर्वसाधारण महिला व पुरुष अशा दोन जागांवर नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. सोनवणे हे भाजपसोबत असले तरी ते अपक्ष म्हणून उमेदवारी लढवतात. यंदा सोनवणे यांना बहुसदस्यीय पद्धतीमुळे तीन नगरसेवक अपक्ष लढवावे लागणार आहेत.
प्रभाग क्रमांक ८ - शिवसेनेच्या शिंदे सेनेचे अभ्यासू माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांचा प्रभाग क्रमांक ८ हा अनुसूचित पुरुष आणि अनुसूचित जमाती पुरुष झाल्यामुळे त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
तुर्भे - या भागातून चार नगरसेवक निवडून आणणारे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यावर १४ गावांची नवीन जबाबदारी आली आहे. परंतु कुलकर्णी यांच्यासमोर आठ नवीन नगरसेवकांना जिंकून आणण्याचे आव्हान आहे. कुलकर्णी स्वतः आणि त्यांचे पुत्र महेश तसेच सून अबोली यांनाही निवडणुकीच्या रिंगणात आणण्याची तयारी करीत आहेत.
कोपरखैरणे - शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे माजी नगरसेवक एम. के. मढवी हे पत्नी आणि मुलगा करण मढवी यांच्यासह सून तेजश्रीला निवडणुकीच्या रिंगणात आणण्यास इच्छुक आहेत.
ऐरोली - माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि मंदाकिनी म्हात्रे यांच्या प्रभाग क्रमांक ७ मधून अनुसूचित जाती पुरुष उमेदवारासाठी जागा आरक्षित केली आहे. तर ओबीसी जागेवर मुलगा अनिकेत उभा राहण्याची तयारी करीत आहे.
बेलापूर - आमदार मंदा म्हात्रे यादेखील त्यांचा मुलगा नीलेश आणि सून नमिता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. नीलेश यांना नगरसेवक पदाचा अनुभव आहे; मात्र नमिता पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
------------------------------------------
यंदाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीने लढवली जाणार आहे. बेलापूर, ऐरोली या दोन्ही मतदारसंघांत आम्ही १११ जागा लढवण्यास तयार आहोत. स्वबळावर आमची ताकद मोठी आहे, पण पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल.
- किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना
-------------------------------------------
बेलापूर विधानसभेतील सर्व जागांवर भाजपचे वर्चस्व असणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा महापौर बसेल.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

Marathi News Esakal
www.esakal.com