जानेवारीत लागू होणार ''मरे''चे नवीन लोकल वेळापत्रक

जानेवारीत लागू होणार ''मरे''चे नवीन लोकल वेळापत्रक

Published on

जानेवारीत लागू होणार मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक
१५ डब्यांच्या लोकलच्या १२ नवीन सेवा; फलाट विस्ताराचे काम डिसेंबरअखेर होणार पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेचे नवीन उपनगरीय लोकल वेळापत्रक जानेवारी २०२५मध्ये लागू होणार आहे. या नवीन वेळापत्रकाद्वारे प्रवाशांना १५ डब्यांच्या लोकलच्या १० ते १२ नवीन सेवा तसेच एका नव्या वातानुकूलित लोकलद्वारे १२ अतिरिक्त सेवा मिळणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य रेल्वेच्या ३४ स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. विस्तारानंतर १२ डब्यांच्या लोकलना १५ डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येक लोकलमधील प्रवासी क्षमतेत जवळपास ३० टक्के वाढ होणार असून, गर्दीच्या तासांतील प्रवाशांची गैरसोय कमी होईल. मुंब्रा रेल्वे अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांच्या लोकलना १५ डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३४ स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवली जात आहेत. यामध्ये जलद मार्गावरील सीएसएमटी, विक्रोळी, कळवा, मुंब्रा आणि दिवा ही स्थानकांचा समावेश आहे. तर ठाणे ते कल्याण धीम्या मार्गावरील ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, दिघा, ठाकुर्ली आणि कल्याण या आठ स्थानकांवरही काम सुरू आहे. याशिवाय उत्तर-पूर्व मार्गावरील शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगांव, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा ही स्थानके तसेच दक्षिण-पूर्व मार्गावरील विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, सेलू, भिवपुरी, कर्जत, पळसदरी, डोळवली, लौजी आणि खोपोली ही स्थानके १५ डब्यांच्या लोकलसाठी सज्ज केली जात आहेत.


१,८१० लोकल सेवा
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दररोज तब्बल १,८१० लोकल सेवा चालवल्या जातात. त्यापैकी २२ सेवा १५ डब्यांच्या असून, ८० सेवा वातानुकूलित लोकलच्या आहेत. सर्व १५ डब्यांच्या लोकल जलद मार्गावर धावतात. दुसरीकडे सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या गर्दीच्या तासांमध्ये सीएसएमटी ते कल्याण तसेच पुढे कसारा, कर्जतपर्यंतच्या मार्गांवर दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे १२ डब्यांच्या लोकलना १५ डब्यांमध्ये रूपांतरित केल्यास प्रवाशांना गर्दीतून दिलासा मिळणार आहे.

प्रवासी सुविधांना चालना
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अलीकडे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी उपनगरीय मार्गावरील गर्दी आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत १५ डब्यांच्या लोकल सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले. रेल्वे प्रशासनाच्या मते, जानेवारीत लागू होणारे नवीन उपनगरीय वेळापत्रक लागू झाल्यानंतर प्रवासी क्षमता वाढेल तसेच जलद आणि धीम्या दोन्ही मार्गांवरील ट्रेन संचालन अधिक वेळेवर आणि कार्यक्षम होईल. नवीन उपनगरीय लोकल वेळापत्रकामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात सुटसुटीतपणा येईल आणि गर्दीच्या तासांतील ताण कमी होईल, अशी अपेक्षा मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com