महिला आरक्षणामुळे दिग्गजांची विकेट

महिला आरक्षणामुळे दिग्गजांची विकेट

Published on

ठाण्यात महिला आरक्षणामुळे दिग्गजांची विकेट
मंत्र्यांच्या सुपुत्रालाही फटका, पुनर्वसनासाठी होणार रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा धुरळा उडण्याआधीच महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज खेळाडूंची विकेट उडाली आहे. यामध्ये परिवहनमंत्री प्रताप सरानाई यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांचाही समावेश आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही मातब्बर माजी नगरसेवकांनाही महिला आरक्षणाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे पुरुषांसह महिला दिग्गजही या आरक्षणामुळे विस्थापित झाले आहेत. आता या इच्छुकांनी पुनर्वसनासाठी त्याच प्रभागात किंवा इतर प्रभागात उमेदवारीसाठी रस्सीखेच करावी लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या चार सदस्य पॅनेलच्या १३१ जागांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये ६६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असल्याने पालिकेवर महिलाराज येणार हे निश्चित आहे. मात्र या आरक्षणाचा अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. यामध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे, पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मातब्बरांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला असून, उमेदवारी देताना शिंदे गटासह भाजपचीही डोकेदुखी वाढणार आहे.

कुणाला कुठे धक्का?
प्रभाग क्रमांक १मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका साधना जोशी यांचा हिरमोड झाला आहे. त्यांचा बांधून ठेवलेला प्रभाग अनुसूचित जमाती पुरुषासाठी आरक्षित झाला आहे. प्रभाग क्रमांक २ मध्येही भाजपच्या माजी नगरसेविका कविता पाटील यांना फटका बसला आहे. २ ब हा नागरिकांचा मागस प्रवर्गमध्ये पुरुषांसाठी आरक्षित झाला आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे मधुकर पावशे यांचा प्रभागही आरक्षित झाला आहे. धक्कादायक म्हणजे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही आरक्षणामुळे आता दुसऱ्या प्रभागाचा आसरा घ्यावा लागणार आहे.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादीचे दिगंबर ठाकूर यांनी शिवसेना शिंदे गटात मोठ्या अपेक्षेने पक्षप्रवेश केला होता. पण त्यांचा प्रभाग महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांनादेखील आरक्षण सोडतीचा फटका बसला असून, त्यांना पर्यायी प्रभाग शोधावा लागणार आहे.
प्रभाग क्रमांक १० अ मधून मागील कित्येक वर्षे अजित पवार गटाचे दिग्गज समजले जाणार नजीब मुल्ला यांनाही त्याच पॅनेलमधून मात्र क किंवा ड प्रभागातून लढावे लागणार आहे.
प्रभाग क्रमांक ११मध्ये भाजपच्या दीपा गावंड यांनादेखील आरक्षणाचा फटका बसला आहे. याच प्रभागातील भाजपचे कृष्णा पाटील यांनादेखील आता पर्याय शोधावा लागणार आहे.
प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये भाजपच्या सुर्वणा कांबळे यांच्यासह ब वार्डातील एकनाथ भोईर यांनादेखील आरक्षणाने धक्का दिला आहे.
प्रभाग क्रमांक १६ अ मध्ये मनीषा कांबळे यांना तर २२ अ मध्ये भाजपचे सुनील हंडोरे हेसुद्धा विस्थापित झाले आहेत.
दिव्यातील प्रभाग क्रमांक २९ अ मधील राष्ट्रावादीतून शिवसेना शिंदे पक्षात गेलेले बाबाजी पाटील यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे.
प्रभाग क्रमांक ३० अ मध्ये राष्ट्रवादीच्या शेख हसीना अब्दुल अजीज आणि प्रभाग क्रमांक ३१ क चे माजी नगरसेवक राजण किणे यांनादेखील आता बाजूच्या प्रभागाचा पर्याय निवडावा लागणार असल्याचे दिसत आहे.

पूर्वेश सरनाईकांसमोर पेच
परिवहन मंत्री सरनाईकांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक प्रभाग क्रमांक १४ अ मधून निवडून आले होते. परंतु आता जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत त्यांच्या प्रभागात महिलेचे आरक्षण पडले आहे. त्याच पॅनेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे इतर मातब्बर माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे या पॅनेलमधून उमेदवारी मिळवताना पेच निर्माण होणार आहे.

आव्हाडांच्या निकटवर्तींनाही फटका
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खंदे समर्थक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती मानले जाणारे शानू पठाण यांनादेखील आरक्षणाचा फटका बसला आहे. ३२ क मधून ते मागील वेळेस निवडून आले होते. परंतु आता हा वॉर्ड महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या मुलीला संधी उपलब्ध होणार असली तरी पठाण यांना उमेदवारीसाठी शोधाशोध करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com