जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात नॉर्मल प्रसुतीवर भर

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात नॉर्मल प्रसुतीवर भर

Published on

ठाण्यात नॉर्मल प्रसूतीकडे कल
तीन वर्षांत ४८ हजार प्रसूतींपैकी ३२ हजार प्रसूती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : प्रसूती म्हटले की, महिलेचा एकप्रकारे पुनर्जन्मच असतो. त्यातच अनेक महिलांना प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना असहनीय असतात. त्यामुळे बहुंताश खासगी रुग्णालयाचा कल हा सर्वाधिक सीझर प्रसूती करण्यावर असतो. त्यातच आता, सीझर ही पद्धतच रूढ होताना दिसत आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सीझरपेक्षा नॉर्मल प्रसूतीलाच पहिली पसंती दिली जात आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात ४७ हजार ८६४ प्रसूती करण्यात आल्या आहेत. यापैकी ३२ हजार ४५३ प्रसूती या नॉर्मल करण्यात आल्या आहेत.
सीझर प्रसूतीच्या जमान्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने नॉर्मल प्रसूतीवर भर देत आहे. अशातही प्रसूतीच्या काळात गुंतागुंतीची अथवा आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास सीझर पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या अंतर्गतील १३ रुग्णालयांमध्ये २०२३-२०२४ ते एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ४७ हजार ८६४ प्रसूती झाल्या. यामध्ये सर्वाधिक ३२ हजार ४५३ या नॉर्मल प्रसूती, तर १५ हजार ४११ सीझर प्रसूती झाल्या असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

५० टक्के सीझर प्रसूती
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. यामुळे महिलांना प्रसूतीसाठी मुंबई अथवा ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कर्जत, कसारा, पालघर, जव्हार आणि ठाणे ग्रामीण भागातून गुंतागुंतीच्या प्रसूती महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. अशा गुंतागुंतीच्या केसेसमध्ये अनेकदा सीझरशिवाय पर्याय उरत नसल्याने महिन्याकाठी ५० टक्के प्रसूती या सीझर होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

प्रसूतीबाबत गैरसमज दूर करून नॉर्मलवर भर
अनेक महिलांच्या मनात प्रसूतीच्या काळात उद्भवणाऱ्या समस्यांची भीती सतावत असते. ही भीती दूर करून त्यांची नॉर्मल प्रसूती करण्यावर डॉक्टरांकडून भर देण्यात येत असतो, मात्र प्रसूतीच्या काळात गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवल्यानंतरच सीझर प्रसूतीचा पर्याय निवडला जात आहे. प्रत्येक गरोदर महिलेनेदेखील आठव्या महिन्यापासून मानसिक आणि शारीरिक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत स्त्रीरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती आकडेवारी
वर्ष नॉर्मल सीझर एकूण
२०२३ -२४ १३४६६ ५२४४ १८७१०
२०२४ - २५ १२७०५ ६२८० १८९८५
२०२५ -२६ ६२८२ ३८८७ १०१६९

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलेची नॉर्मल प्रसूती करण्यावर अधिक भर देण्यात येत असतो. अनेकदा ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातून अडलेल्या व गुंतागुंतीच्या केसेस येत असतात, त्यावेळी सीझर प्रसूती करण्यात येत असते.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com