पवईत मलनिःसारण टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू
पवईत मलनिस्सारण टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू
घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) : पवई, हिरानंदानी येथील राज ग्रँडर या गगनचुंबी इमारतीमधील भूमिगत मलनिस्सारण (सेप्टिक) टाकीची साफसफाई करताना आज सकाळी भीषण दुर्घटना घडली. टाकीतील विषारी वायूमुळे (गॅस) तीन मजूर गुदमरले. या दुर्घटनेत एका अज्ञात २४ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या फुलचंद कुमार (वय २८) या मजुरावर हिरानंदानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तिसऱ्या मजुराची स्थिती स्पष्ट झालेली नाही.
ही घटना आज (ता. १२) सकाळी १०.४० वाजता राज ग्रँड दोई बिल्डिंग, हिरानंदानी हॉस्पिटलसमोर घडली. सफाईचे काम अल्ट्रा टेक प्रायव्हेट लिमिटेडकडे सोपवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पवई पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

