गतिमंद तरुणीवर अत्याचार
गतिमंद तरुणीवर अत्याचार
गुन्हेगाराच्या शोधासाठी तुर्भे पोलिसांची मोहीम
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : गतिमंद मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना तुर्भे परिसरात घडली आहे. दोन दिवसांपूर्वी पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, गुन्हेगाराच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तुर्भे परिसरात भटकणाऱ्या गतिमंद तरुणीला एका महिलेने आसरा दिला. ही तरुणी दिवसभर भटकून सायंकाळी परत येत होती. याच दरम्यान तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत कुणी तरी व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे तरुणी गरोदर होती. तरुणीच्या पोटात दुखू लागल्यावर ही बाब लक्षात आली. दोन दिवसांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला असून, डॉक्टरांना संशय आल्याने याबाबतची माहिती तुर्भे पोलिसांना देण्यात आली होती.
----------------------
डीएनएची तपासणी
गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बाळाच्या डीएनए तपासणीची तयारी सुरू केली आहे. वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच गतिमंद तरुणीकडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

