अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा
अखेर ‘त्या’ बांधकामांवर कारवाईचा बडगा
तीन रूम व सहा जोते बांधकाम जमीनदोस्त; भूमाफियांचे धाबे दणाणले
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) ः ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील विलगीकरण (आयसोलेशन) रुग्णालयाच्या आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे बांधकामे उभारण्यात आली होती. या बांधकामांवर आता पालिकेकडून धडक कारवाई गुरुवारी (ता. १३) करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा परिसरात आरक्षण क्रमांक २८ अंतर्गत आरक्षित केलेल्या विलगीकरण (आयसोलेशन) रुग्णालयाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक भूमाफिया यांच्या संगनमताचा गंभीर आरोप आदिवासी विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांनी केला होता. यावर संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू असेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी सांगितले होते. यानुसार जयवंत चौधरी यांनी आरक्षित भूखंडावरील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली आहे.
बुधवारी टिटवाळा पूर्वेतील आरक्षित भूखंडावर सुरू असलेल्या अनधिकृत तीन रूम आणि सहा जोते बांधकाम अनधिकृत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केले. यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
मोहीम तीव्र करणार
तर आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई उपायुक्त समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्यात येईल. ही कारवाई मोहीम आणखी व्यापक करणार असल्याचे जयवंत चौधरी यांनी सांगितले.

