रेडिसन हॉटेल ग्रुपचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी करार
रेडिसन हॉटेल ग्रुपचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी करार
महाराष्ट्रातील पहिले आलिशान हॉटेल प्रकल्प; २०३०ला होणार पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : भारतातील आलिशान हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपल्या उपस्थितीचा विस्तार करीत रेडिसन हॉटेल ग्रुपने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. या कराराअंतर्गत नवी मुंबई विमानतळ परिसरात ‘रेडिसन कलेक्शन हॉटेल’ उभारण्यात येणार असून, यामुळे रेडिसन कलेक्शन या ब्रँडचे महाराष्ट्रात प्रथमच आगमन होणार आहे.
हा नवा प्रकल्प २०३०च्या पहिल्या तिमाहीत सुरू करण्याचे नियोजन असून, हॉटेलमध्ये सुमारे ३५० आलिशान खोल्या व सुइट्स, आकर्षक रेस्टॉरंट्स, रूफटॉप बार तसेच वर्ल्ड क्लास स्पा आणि वेलनेस सेंटर असणार आहेत. कॉर्पोरेट बैठका, सामाजिक समारंभ आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी खास डिझाइन केलेली इव्हेंट स्पेसदेखील येथे उपलब्ध राहील. रेडिसन हॉटेल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीओओ (दक्षिण आशिया) निखिल शर्मा यांनी सांगितले, की नवी मुंबईसारख्या जलद विकसित होणाऱ्या क्षेत्रात आमचा प्रीमियम ब्रँड सुरू करताना आम्हाला अभिमान वाटतो. नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात व्यावसायिक व ट्रांझिट प्रवासाची मोठी वाढ अपेक्षित आहे. हे हॉटेल आलिशान निवासाच्या नव्या संकल्पना साकारेल आणि नवी मुंबईच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला नव्या उंचीवर नेईल. तर रेडिसन ग्रुपचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर (दक्षिण आशिया) दवाशिष श्रीवास्तव म्हणाले, की नवी मुंबईची आधुनिक पायाभूत सुविधा आणि वाढती कनेक्टिव्हिटी ‘रेडिसन कलेक्शन’साठी आदर्श ठिकाण ठरते. हा प्रकल्प जागतिक दर्जाचे मानक राखत स्थानिक संस्कृती आणि ओळख अधोरेखित करेल.

