डोंबिवलीत भाजपा शिंदे गटाची बॅनरबाजी
पक्षप्रवेश फिके पण बॅनरबाजी ठसठशीत
डोंबिवलीत भाजपा शिंदे गटाची बॅनरबाजी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः कल्याण-डोंबिवलीचं राजकारण सध्या भाजप आणि शिंदे गटाभोवती फिरत आहे. या दोन पक्षांनी डोंबिवली पश्चिमेतील दोन्ही म्हात्रे यांना आपल्या गोटात दाखल करून घेतलं. मात्र, या दोन्ही पक्षप्रवेशाच्या सोहळ्यांना अपेक्षित तो उत्साह आणि गाजावाजा लाभला नाही. परिणामी, आता या दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी करूनच प्रवेशाचं शक्तीप्रदर्शन दाखवायला सुरुवात केली आहे.
दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश हे दोन्ही कार्यक्रम थाटामाटात मुंबईला होतील, अशी अपेक्षा साऱ्यांना होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत दीपेश यांचा प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपने त्यांच्या शहरात आयोजित एका कार्यक्रमाच्या मंचावर हा सोहळा उरकून घेतला. या सोहळ्यास अमृता फडणवीस आणि नाईक हे उपस्थित राहिले नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिक पातळीवर हा सोहळा उरकण्यात आला. शिवाय म्हात्रे यांच्यासोबत प्रवेश केलेल्यांमध्ये फारसे बडे मासे गळाला लागले आहेत, असे काही दिसून आले नाही.
दीपेश यांचा प्रवेश होताच शिंदे गटाने विकास म्हात्रे यांच्या प्रवेशाची लगबग सुरु केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र ठाण्यात उपस्थित नसल्याने प्रवेशाची वेळ दोन ते तीन वेळा बदलण्यात आली. म्हात्रे शिंदे यांची वाट पहात बंगल्यावर ताटकळत बसले होते. अखेर रात्री उशिरा साडेअकराच्या दरम्यान उपमुख्यमंत्री येताच हा सोहळा उरकून घेण्यात आला. या दोन्ही सोहळ्यांमध्ये गर्दी आणि गाजावाजा अपेक्षेपेक्षा मर्यादितच राहिला.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून दोन्ही गट आता दृश्य शक्तीप्रदर्शनात उतरले आहेत. कोणाकडे जास्त बॅनर, कोणाचं पोस्टर मोठं, या दृश्यस्पर्धेवरून स्थानिक नेत्यांचा आत्मविश्वास आणि पक्षातील वजन मोजलं जातं आहे. नागरिक प्रवेश सोहळे विसरले, पण बॅनर बाजीने राजकारण पुन्हा पेटवलं जात आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बॅनरद्वारे शक्तीप्रदर्शन
पक्षांतील वरिष्ठाना अपेक्षित असे वातावरण शहरात निर्माण न झाल्याने शहरात प्रवेशाचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला एखाद दुसरा बॅनर शहरात दिसला. मात्र नंतर मुख्य रस्ते, चौकाचौकात यांचे मोठं मोठे बॅनर, फ्लेक्स लागल्याचे दिसून येत आहे. दीपेश आणि योगेश म्हात्रे यांचे भाजप प्रवेशाचे स्वागत-बॅनर एका बाजूला तर विकास म्हात्रे, नंदू धुळे-मालवणकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचे मोठे फ्लेक्स दुसऱ्या बाजूला असे चित्र शहरात दिसत आहे. प्रवेशसोहळ्यांचा गाजावाजा न झाल्याने दोन्ही गटांनी बॅनरद्वारे आपले शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. पक्षप्रवेश हा फक्त औपचारिकतेपुरता राहिला. दोन्ही म्हात्रे यांचे वजन वाढविले जातं आहे की कमी करण्यासाठी पक्षाचीच ही खेळी होती असे देखील बोलले जात आहे.

