मातोश्रीचे दूत विरारमध्ये!
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १३ : आतापर्यंत एकमेकांविरोधात लढलेले बविआ आणि शिवसेना ठाकरे गट हे पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विलास पोतनीस आणि पालघर जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रमुख अमोल गजानन कीर्तीकर यांनी बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची विरार येथे बुधवारी (ता. १२) भेट घेत चर्चा केली. या एकूणच प्रकाराकडे ‘मातोश्रीचे दूत विरारमध्ये’ या दृष्टीने पाहिले जात असून, ही ठाकरे-ठाकूर युतीची नांदी समजली जात आहे.
पालघर जिल्ह्यात भाजपची वाढती लोकप्रियता आणि बविआची झालेली पीछेहाट तसेच ठाकरे गटालाही पुन्हा उभारी मिळावी, यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार पोतनीस व कीर्तीकर यांनी ठाकूर यांच्याशी आगामी काळात राजकीय सोयरीक करण्याबाबत चाचपणी केली. बविआने यापूर्वीच उद्धव ठाकरे हे भविष्यात मुख्यमंत्री असावेत, अशी भूमिका घेतली आहे.
आगामी काळात महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व प्रकारच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रस्ताव ठाकरे गटाने बविआला दिल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. नेमकी अशीच भूमिका बविआनेदेखील घेतल्याने आगामी काळात पालघर जिल्ह्यात ठाकरे-ठाकूर एकत्र येण्यास अडचण नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे वसई पूर्वेतील चिंचोटी येथे मविआमधील विविध घटक पक्ष व बविआच्या पदाधिकाऱ्यांची आगामी निवडणुकांसदर्भात बैठक झाली.
राजकीयदृष्ट्या ‘फील गुड’चा अनुभव
मविआ आणि बविआ एकत्र येण्याबाबत दोघांच्या प्रमुख मंडळींनी सकारात्मक भाष्य केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस विजय पाटील यांनी दोघांनी निवडणुकांसाठी एकत्र येण्यावर विशेष जोर दिल्याचे या बैठकीत दिसले. एकंदरीत आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन गटांत राजकीयदृष्ट्या ‘फील गुड’चा अनुभव येणार असल्याचे दिसत आहे.

