बेकायदा टायर कंपनीच्या मालकांवर गुन्हा
वाडा, ता. १३ (बातमीदार) : वडवलीतर्फे पौलबारे या गावातील एका बेकायदा टायर कंपनीत आगीचा भडका होऊन कामगार गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेस मालकांना जबाबदार धरून सुरक्षेची कोणती उपाययोजना न केल्याने हा ठपका ठेवून त्यांच्यावर वाडा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडवलीतर्फे पौलबारे येथे अमेझिंग इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. या कंपनीत जुने टायर जाळून त्यातून तेल आणि तारांचे उत्पादन घेतले जाते. ७ नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास टेटिया झुम्ला भाबोर (वय २२) हा कामगार बाॅयलरमधील यंत्रामध्ये लाकडे पेटवित असताना वायूची तोटी चालू असल्याने आगीचा भडका होऊन तो गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या कंपनीची अधिक चौकशी केली असता, तिला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसल्याने उघडकीस आले. विनापरवाना ही कंपनी चालू असल्याने व कंपनीत कुठलीही सुरक्षेची उपापयोजना न करता निष्काळजीमुळे कंपनीचे मालक अब्दुल हसन मोहम्मद उस्मान अत्तरवाला, कैफी मुस्ताक लोनबाल, शोएब नाजिर कुदई यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवंत चौधरी करीत आहेत. तिन्ही संशयित फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

