हळदीच्या दिवशी नवरदेवाचा उमेदवारी अर्ज!
हळदीच्या दिवशी नवरदेवाचा उमेदवारी अर्ज!
शीतल मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. १२ ः लग्न सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असतानाच अंबरनाथच्या वांद्रापाडा येथील आकाश पुजारी या २८ वर्षीय तरुणाने प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवार म्हणून नगर परिषद निवडणुकीचा नामनिर्देशन अर्ज दाखल केला असून, या अनोख्या घटनेने शहरात आणि निवडणूक विभागात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी अजूनही उमेदवार निश्चित केलेले नाहीत, तर अनेक जण उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त शोधत असताना एका तरुणाने स्वत:च्या लग्न सोहळ्यात व्यस्त असतानाही नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. वांद्रापाडा येथील आकाश पुजारी याने ‘आधी लग्न कोंढाण्याचे’ म्हणत प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवार म्हणून आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. या वेळी मला मिळालेल्या या संधीचा नक्कीच जनतेच्या सेवेवसाठी उपयोग करेन, अशी भावना या वेळी पुजारी यांनी व्यक्त केली आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी १२ नोव्हेंबरपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे शहरात शांतता पसरली होती. आकाश पुजारी या ‘नवरदेव उमेदवाराने’ पहिला अर्ज दाखल करून या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात केली. यामुळे निवडणूक विभागात आणि स्थानिक राजकारणात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी विजयानंद स्वानंद शर्मा आणि अंबरनाथ नगर परिषद मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी हा अर्ज स्वीकारला.
या वेळी पुजारी परिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा धाडसी आणि सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल नागरिकांनी आकाश पुजारी यांचे स्वागत केले जात आहे. अंबरनाथला एक नवा, ऊर्जावान आणि तरुण प्रतिनिधी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
जनतेचे सहकार्य
लग्न हा माझ्या आयुष्यातील खास क्षण आहे, पण शहरासाठी काहीतरी करण्याची संधीही मला गमवायची नव्हती. म्हणूनच मी आजच उमेदवारी अर्ज दाखल केला. मला मिळलेल्या या संधीचा मी नक्कीच जनतेच्या सेवेसाठी उपयोग करेन, अशी भावना पुजारी यांनी व्यक्त केली. तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याचा ध्यास घेतलेल्या पुजारी यांनी जनता आपल्याला नक्कीच सहकार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

