महायुतीतच वर्चस्वाची लढाई

महायुतीतच वर्चस्वाची लढाई

Published on

महायुतीतच वर्चस्वाची लढाई
नाईक-सरनाईक यांचा ‘जनता दरबार’
विरार, ता. १५ (बातमीदार) : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका कधीही जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विरार-वसई क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन केले. या जनता दरबारातून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय इशारा देत वसई-विरार महापालिकेवरील हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी गणेश नाईक यांनी ठाणे आणि मिरा-भाईंदरमध्ये जनता दरबार घेऊन एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आता वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयातच शुक्रवारी (ता. १४) पार पडलेला त्यांचा हा पहिलाच जनता दरबार होता.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) बऱ्यापैकी वर्चस्व आहे. तर महापालिकेवर गेल्या दोन निवडणुकांपासून (२०१० आणि २०१५) हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे निर्विवाद वर्चस्व आहे. वसई-विरार महापालिका हा ठाकूरांचा बालेकिल्ला मानला जातो. नाईकांच्या जनता दरबारातून भाजपने एकाच वेळी दोन राजकीय उद्दिष्टे साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
पालघर जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री गणेश नाईक जनता दरबार घेत असतानाच दुसरीकडे त्यांना शह देण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हेदेखील त्याच क्षेत्रात ‘जनता दरबार’ आयोजित करीत आहेत. यामुळे पालघर आणि वसई क्षेत्रात महायुतीतील भाजप आणि शिंदे सेनेतच वर्चस्वाची लढाई स्पष्टपणे दिसत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पालघरमध्ये जास्त जागा निवडून आल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आजही या ठिकाणी सक्रिय आहे. जिल्हा परिषदेवर शिंदे सेनेचा अध्यक्ष बसला होता आणि आगामी महापालिकेतही ‘महापौर आमचाच होणार’ अशी घोषणा शिंदे सेनेने केली होती. त्यामुळे भाजपने सावध पवित्रा घेऊन गणेश नाईक यांना मैदानात उतरवले आहे. गणेश नाईक आणि हितेंद्र ठाकूर यांचा याराना जगजाहीर आहे. यामुळे नाईक यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर ठाकूरांवर अप्रत्यक्षपणे वचक आणि दबाव ठेवण्याचे काम भाजप करीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिंदेंना इशारा
पालघर जिल्ह्यात शिंदे गटाचे चांगले वर्चस्व आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘जनता दरबार’ घेतल्याने शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाला एकप्रकारे थेट राजकीय इशारा देण्यात आला आहे.

ठाकूरांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत बविआच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजप सक्रिय झाली आहे. नागरिकांच्या समस्या थेट महापालिका मुख्यालयात सोडवून भाजप जनतेसाठी काम करीत आहे, असा संदेश देऊन ठाकूरांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठाकूरांना रोखण्यासाठी धक्का तंत्र
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बविआला रोखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. यापूर्वी भाजपने बविआ पक्षातील माजी नगरसेवक, प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात सामील करून घेत धक्का दिला होता. आरक्षण सोडत झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच नाईक यांचा हा जनता दरबार आयोजित करणे, हे बविआला रोखण्यासाठी भाजपच्या धक्का तंत्राचा भाग असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com