बक्षिसांचा विचार करू नका तर स्पर्धा म्हणून कला सादर करा

बक्षिसांचा विचार करू नका तर स्पर्धा म्हणून कला सादर करा

Published on

‘बक्षिसांचा विचार करू नका, तर स्पर्धा म्हणून कला सादर करा’
नाट्य अभिनेते व सिनेकलावंत ऋतुराज फडके यांचे प्रतिपादन
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : २००२ मध्‍ये माझे गुरू रंगकर्मी रवींद्र लाखे यांच्या आशीर्वादाने आणि प्रशिक्षणाने मी या रंगभूमीवर कलाकार म्हणून पाहिले पाऊल ठेवले, मात्र आज याच रंगभूमीवर मी नाट्य स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यास अध्यक्ष या नात्याने उपस्थित आहे. हा या रंगभूमीने मला दिलेला सन्मान आहे. त्यामुळे बक्षिसांचा विचार करू नका, तर स्पर्धा म्हणून कला सादर करा, असा मोलाचा सल्ला नाट्य अभिनेते व सिनेकलावंत ऋतुराज फडके यांनी दिला. कल्याण केंद्रावरील ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते.
आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मंगळवारी (ता. ११) राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. उद्‍घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी ऋषिकेश व सुप्रिया जावडेकर यांनी सुस्वर अशी नांदी गात नटराज पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. या स्पर्धेची सुरुवात शहापूरच्या अभिजात कलासंपदा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या बुद्धिबळ आणि झब्बू या नाट्यप्रयोगाने करण्यात आली.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ऋतुराज फडके, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रतिनिधी जयश्री घुगे, नाट्य स्पर्धेचे समन्वयक शिवाजी शिंदे, बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या अध्यक्षा व अभिनेत्री सुजाता डांगे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे कोषाध्यक्ष हेमंत यादगिरे, नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्यदिग्दर्शक संजय दिपूकडे, संयुक्ता थोरात व ईश्वर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते, तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय गावडे, विशाल पितळे, विशाल केंबुळकर, स्वप्नील चांदेकर, सचिन माने, दीपक नाईक, सौरभ आरोटे, प्रकाश जोशी, सिद्धेश यादगिरे यांनी मेहनत घेतली.

Marathi News Esakal
www.esakal.com