युनियनचे प्रवाश्यांच्या बांधिलकीला प्राधान्य
मुंबई सेंट्रल येथील टॅक्सी स्टँडचा प्रश्न मार्गी!
शिवडी, ता. १३ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वाहतूक विभागाचे प्रमुख सुनील बोरकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील टॅक्सी स्टँड नियमित सुरू करण्यात मोठे यश मिळाले आहे. बोरकर यांनी रेल्वे अधिकारी आणि स्थानिक टॅक्सी युनियन पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यामुळे टॅक्सी स्टँड सुरळीत झाला आहे. यामुळे टॅक्सीचालकांना नियमित भाडी मिळतील, तसेच प्रवाशांचे होणारे हाल कमी होतील.
याचसोबत, लोढा एक्सेल स्टँड येथील टॅक्सी स्टँडच्या तक्रारीही बोरकर यांच्या पुढाकाराने संबंधित पोलिस निरीक्षकांशी समझोता घडवून आणत दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन चालक व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या दोन्ही यशस्वी प्रयत्नांबद्दल संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सुनील बोरकर यांच्यासह युनियनच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. टॅक्सीचालकांबरोबरच प्रवाशांच्या हिताचा विचार केल्याबद्दल अहिर यांनी युनियनच्या भूमिकेचे स्वागत केले.

