पक्षप्रवेश
आजी-माजी सरपंचांचा शिंदे गटात प्रवेश
मनोर, ता. १३ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार विलास तरे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. महामार्गावरील ढेकाळे येथील जनसंपर्क कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी माजी आमदार अमित घोडा आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश पार पाडले जात आहेत. हालोली बोट ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश सांबरे, उपसरपंच योगेश सातवी, नवी दापचेरी ग्रामपंचायत सरपंच संदीप आरज, कोकणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच मालिनी इभाड, करवाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत दळवी, नावझे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीप जाधव, नवघर घाटीम ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख वंदेश पाटील यांच्यासह तळेखल, उचावली, पेणंद, नांदगांव आंवढाणी आणि साखरे गावातील बविआ आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.
.........................................
भाजपचा शिंदे सेनेला धक्का
मनोर, ता. १३ (बातमीदार) : पालघर शहरात शिंदे गटाला धक्का देत भाजपकडून शहर संघटिका आणि अन्य महिला पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती एकत्र राहण्याची आशा संपुष्टात आली आहे. सोमवारी (ता. १०) रात्री खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या शहर संघटिका सविता मल्लाह आणि अन्य महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या डहाणू येथील पक्ष कार्यालयात प्रवेश पार पडला. पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शिल्पा बाजपेयी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता. शिल्पा वाजपेयी यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या पालघर शहर संघटिका सविता मल्लाह यांना वार्ड क्रमांक १३ मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता संपुष्टात आली होती. त्यामुळे सविता मल्लाह यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

