मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने,

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने,

Published on

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने
पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गाचे काम ८५ टक्के पूर्ण


मनोर, ता. १३ : मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. तलासरी ते डहाणू तालुक्याच्या हद्दीतील टप्प्यात भराव आणि काँक्रीटीकरणाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. पालघर जिल्ह्यातील महामार्गाची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून वाहतूक सुरू होण्याची शक्यता असल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील नद्यांवरील बहुतांश पुलांची बांधकामे पूर्ण करण्यात आली असून, सद्य:स्थितीत पालघर तालुक्यातील सोनावे आणि दहिवाले गावांदरम्यान वैतरणा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर (DMIC)चा भाग आहे. मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्गाची लांबी ३८० किलोमीटर असून, पालघर जिल्ह्यात १२० किलोमीटर लांबीचा भाग महत्त्वाचा आहे. महामार्गामुळे डोंगराळ भाग, नद्या, वन क्षेत्राचा मोठा भाग बाधित झाला. भूसंपादन प्रक्रिया, पर्यावरणीय मंजुरी, स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या आणि वन विभागाच्या जमिनी अशा अडचणी निर्माण झाल्या होत्या. २०२०-२१दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे काम सुरू होण्यासाठी विलंब झाला होता. या महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील काम २०२१च्या अखेरीस सुरू झाले होते. पालघर जिल्ह्यातील १२० किलोमीटर लांबीपैकी अंदाजे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सोनावे आणि दहीवाले गावांदरम्यान वैतरणा नदीवरील पुलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. रस्त्याच्या निर्मितीसाठी माती-मुरूम भरावाचे काम ९० टक्के झाले आहे. महामार्गाच्या आरेखनात संरक्षित वनक्षेत्र आणि खाडी क्षेत्रातील कांदळवनामुळे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. कामाला सुरुवात झाल्यानंतर मान्सून कालावधीत जुलै-सप्टेंबरदरम्यानच्या जोरदार पावसामुळे कामाची गती मंदावली होती. तसेच बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादनाप्रकरणी न्यायालयीन दावे दाखल केल्याने महामार्ग निर्मितीत आव्हाने उभी राहिली होती. पालघर जिल्ह्यातील तलासरी ते डहाणू तालुक्याच्या हद्दीतील टप्प्याचे काम ९५ टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित टप्प्याची प्रगती ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यातील महामार्गाची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
----
कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ
मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-बडोदा दरम्यानच्या प्रवासातील वेळेत घट होणार आह. उरणस्थित जेएनपीटी बंदर, कोकण, गोवा आणि पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहनांच्या संख्येत घट होणार आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन आणि कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार आहे.
---
पालघर जिल्ह्यातील एका टप्प्याचे काम ९५ टक्क्यापर्यंत तर उर्वरित दोन टप्प्यांची प्रगती ८५ टक्के झाली आहे. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत तिन्ही टप्प्यांतील कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com