कामाचा ताण वाढवत आहे आजार
कोरोनानंतर तरुण आणि महिलांमध्ये मधुमेहाच्या प्रमाणात वाढ
कामाचा ताण, बदललेली जीवनशैली कारणीभूत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कोरोना साथीच्या आजारानंतर सर्व वयोगटांत, विशेषतः तरुण आणि महिलांमध्ये, मधुमेहाच्या लक्षणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांच्या अभ्यासातून समोर आले आहे. कामाचे वाढलेले तास, घरून काम करण्याची पद्धत, बदललेली जीवनशैली आणि मानसिक ताण ही मधुमेहाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. कोविडपूर्वी कामाच्या ताणामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण केवळ २० टक्के होते, जे आता कोविडनंतर ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे.
जेंद्रा हेल्थकेअर क्लिनिकचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. राजीव कोविल यांनी २०१५ ते २०२० आणि २०२० ते २०२५ या दोन कालखंडातील रुग्णांच्या डेटाची तुलना केली. साथीपूर्व काळात ७,२७४ रुग्ण भेटी झाल्या, तर कोविडनंतर रुग्णांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल जाणवला. विशेष म्हणजे, पूर्वी पुरुष रुग्णांचे प्रमाण ६४ टक्के होते, ते आता ५८ टक्क्यांपर्यंत घटले असून, पुरुष-महिला रुग्णांची संख्या जवळपास समान झाली आहे. महिला रुग्णांचे प्रमाण वाढल्याचेही डॉक्टरांचे निरीक्षण आहे.
डॉ. कोविल यांच्या मते, मधुमेहाची लवकर तपासणी सकारात्मक असली तरी, तो टाळण्यासाठी कार्यस्थळांवर कल्याण कार्यक्रम आणि सामुदायिक शिक्षण आवश्यक आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ जानेवारी ते ३० ऑक्टोबरपर्यंत एक कोटी ५० लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली असून, २८ लाख रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत.
जनजागृती मोहीम
तरुणांमध्ये निरोगी सवयी वाढवण्यासाठी मुंबईतील १०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये ‘हेल्दी कॅम्पस’ आणि ‘मीठ-साखर मोहीम’ यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्याचा उद्देश ‘निरोगी खा, निरोगी राहा, आनंदी राहा’ हा संदेश देणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

