धारावीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता

धारावीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता

Published on

धारावीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता
आरक्षण सोडतीनंतर राजकीय घडामोडींना वेग
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. १५ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्‍यानंतर धारावीतील सात वॉर्डांतील चार वॉर्डांत फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षात धावपळ सुरू झाली आहे. २०१७ मध्ये निवडून आलेल्या सात पैकी चार नगरसेवकांना घरी बसावे लागेल किंवा दुसऱ्या वॉर्डातून नशीब अजमवावे लागेल, असे दिसत आहे.
२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन तर शिवसेनेचे (ठाकरे गट) चार व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे एक असे सात नगरसेवक होते. त्यातील काँग्रेसचे नगरसेवक बब्बू खान यांचा वॉर्ड क्रमांक १८४ हा गेल्यावेळी खुला होता. या वेळी तो वॉर्ड सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाल्याने त्यांना बाजूचा १८५ किंवा १८८ वॉर्ड येथे प्रयत्न करावे लागतील, तर वॉर्ड क्रमांक १८६ हा २०१७ मध्ये ओबीसी म्हणून आरक्षित झाल्याने शिवसेनेचे (सध्या ठाकरे गट) वसंत नकाशे यांना लॉटरी लागली होती. ते नगरसेवक म्हणून जिंकून आले होते. या वेळी त्यांचा वॉर्ड अनुसूचित महिलांकरिता आरक्षित झाल्याने त्यांना वॉर्ड क्रमांक १८५ किंवा १८८ येथून निवडणूक लढवावी लागेल, तर शिवसेनेच्या (ठाकरे गट) मारी अम्मल थेवर यांचा वॉर्ड क्रमांक १८७ हा ओबीसी म्हणून आरक्षित झाल्याने थेवर यांना त्यांच्या बाजूचा खुला प्रवर्ग म्हणून जाहीर झालेला वॉर्ड क्रमांक १८८ मध्ये प्रयत्न करावे लागतील.
२०१७ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडून आलेल्‍या मनसेच्या ज्या सात नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला, त्‍यामध्ये धारावीतील वॉर्ड क्रमांक १८९ मधून निवडून आलेल्या हर्षला मोरे या एक नगरसेविका होत्या. त्यांचा वॉर्ड गेल्यावेळी सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला होता. यंदा त्यांचा वॉर्ड क्रमांक १८९ हा अनुसूचित महिलांकरिता आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याच वॉर्डातून संधी मिळू शकते.
वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गंगा कुणाल माने या निवडून आलेल्या होत्या. त्यांचा वॉर्ड अनुसूचित जाती महिला म्हणून आरक्षित झालेला आहे. गेल्यावेळी सर्वसाधारण महिलांसाठी हा वॉर्ड आरक्षित झाला होता. २०१७ मध्ये वॉर्ड क्रमांक १८५ शिवसेनेचे (ठाकरे गट) टी. जगदीश हे निवडून आले होते. यंदा हा वॉर्ड खुला प्रवर्ग म्हणून जाहीर झाल्याने ते सुरक्षित झाले आहेत.

तिकीट मिळवण्यासाठी चुरस
गेल्या निवडणुकीत नगरसेवक म्‍हणून निवडून आलेल्‍या किती जणांना पक्ष नेतृत्‍वाकडून पुन्हा संधी मिळतेय, हे पाहावे लागेल, मात्र आरक्षण जाहीर झाल्याने तिकीट मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com