ध्वनी प्रदूषणापासून सुटका

ध्वनी प्रदूषणापासून सुटका

Published on

ध्वनिप्रदूषणापासून सुटका
नवी मुंबईत ५९४ ठिकाणे शांतता क्षेत्र
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तब्बल ५९४ ठिकाणांना अखेर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये २८८ शाळा/रुग्णालये, ३०६ धार्मिक स्थळांचा समावेश असल्याने ध्वनिप्रदूषणापासून नागरिकांची सुटका झाली आहे.
राज्य शासनाने शैक्षणिक संस्था, न्यायालये, रुग्णालये, धार्मिक स्थळांना शांतता क्षेत्र घोषित करण्याचे आदेश महापालिकांना दिले होते. नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या निर्णयाची नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेने शहरातील २८८ शाळा/रुग्णालये आणि ३०६ धार्मिक स्थळांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. शांतता क्षेत्र घोषित केल्यामुळे या परिसराच्या १०० मीटरच्या आत ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
-----------------------------
हक्कांचे रक्षण
नवी मुंबई महापालिकेचा निर्णय नागरिक, शाळा-कॉलेज, रुग्ण, सर्व संवेदनशील सुविधा क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आमची लढाई केवळ शांतता क्षेत्रापुरती मर्यादित नसून, प्रशासन व स्थानिक स्वराज संस्था यांनी कायदे पाळावेत, पर्यावरणीय नियम काटेकोरपणे राबवावेत आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, यासाठी असल्याचे याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता ॲड. विनायक गाडेकर यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com