भाजपविरोधात ''सर्वपक्षीय महाआघाडी''

भाजपविरोधात ''सर्वपक्षीय महाआघाडी''

Published on

भाजपविरोधात ‘सर्वपक्षीय महाआघाडी’
डहाणू नगर परिषद निवडणुकीत नवा प्रयोग!
कासा, ता. १५ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद निवडणुकीत शनिवारी (ता. १५) मोठी राजकीय उलथापालथ झाली. डहाणूमधील ‘व्यक्तिगत एकाधिकारशाही’विरोधात लढा देत, विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याच्या उद्देशाने तीन प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन ‘महाआघाडी’ची स्थापना केली आहे. यामुळे डहाणू नगर परिषद निवडणुकीत नवीन राजकीय समीकरण तयार झाले असून, आगामी लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

महाआघाडीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीने सोमवारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक राजकीय घडामोडीची घोषणा करण्यासाठी मसोली शिवसेना कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपवर आणि त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली.

शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी म्हटले की, डहाणूची सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही लढाई डहाणूच्या भवितव्यासाठी आहे, तर शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी म्हटले की, डहाणूत गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झालेली व्यक्तिगत एकाधिकारशाही संपवण्यासाठी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. डहाणूच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मिहीर शहा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, डहाणूमध्ये आता बदलाची वेळ आली आहे. एकत्रितपणे लढा दिल्यासच विकासाचा मार्ग मोकळा होईल.

आघाडीला इतरांचीही साथ
महाआघाडीत सुरुवातीला तीन प्रमुख पक्ष असले तरी, इतर पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता रवींद्र पाठक यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येऊन निवडणूक लढवणार असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि इतर पक्षांचा देखील आम्हाला पाठिंबा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, रवींद्र पाठक, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, मिहिर शहा, नीलेश सांबरे, माजी आमदार अमित घोडा, माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक आणि राजू माच्छी यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com