बालदिनानिमित्त चित्रकला व रांगोळी स्पर्धा
पालघरमध्ये चित्रकला, रांगोळी स्पर्धा उत्साहात
पालघर, ता. १५ (बातमीदार) : नशामुक्त भारत अभियानांतर्गत पालघर येथे बालदिनानिमित्त (ता. १४) शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि निसर्गप्रेमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शिक्षण सेवा मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय, जूचंद्र येथे करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करण्यासाठी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ व व्यसनमुक्ती या विषयावर स्पर्धेचे आयोजन केले होते. सह्याद्री शिक्षण सेवा मंडळाच्या शाळांमधील सुमारे २५० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. बक्षीस वितरण नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश आवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरी शर्मा, द्वितीय क्रमांक दैविक राऊत, तृतीय क्रमांक अनुराधा; तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक नंदनी, द्वितीय क्रमांक निधी साटम, तृतीय क्रमांक विधी पाटील यांनी पटकावले. विजेत्यांना प्रमाणपत्र व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. शेवटी तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

