कासा ग्रामपंचायतीतर्फे आदिवासी वीरांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
कासा, ता. १५ (बातमीदार) : येथील कासा ग्रामपंचायतीतर्फे क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त कासा-नाशिक राज्यमार्गावरील सायवन नाका परिसरातील बिरसा मुंडा चौकात उत्साहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी संघर्षाचे प्रतीक, जल-जंगल-जमिनीच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे जननायक बिरसा मुंडा यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहणे हा कर्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वक्त्यांनी बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनाची, त्यांनी समाजाच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या उठावाच्या इतिहासाची आणि आदिवासींच्या धर्म, अस्मिता व अस्तित्व रक्षणासाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. ते आजही प्रेरणादायी योद्धा आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी कासा ग्रामपंचायत सरपंच सुनीता कामडी, उपसरपंच हरेश मुकणे, ग्रामपंचायत सदस्य सुदाम कदम, माजी पंचायत समिती सदस्य अरुण कदम, अन्य ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित काम करण्याची प्रतिज्ञा केली. हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, आदिवासी परंपरा आणि इतिहासाप्रती अभिमान जागवणारा ठरला.

