दृष्टिहीन विद्यार्थ्यांची मुरुड जंजिरा जलदुर्ग अविस्मरणीय मोहीम फत्ते...
दृष्टिहीन विद्यार्थ्यांची मुरूड जंजिरा जलदुर्ग अविस्मरणीय मोहीम फत्ते
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : महादरवाजावरील लोखंडी कडी, टोकदार खिळे, शतकानुशतकं उभ्या असलेल्या भिंती आणि तोफांचा स्पर्श घेत मुरुड जंजिरा किल्ल्याचा इतिहास ‘ऐकला’ आणि ‘अनुभवला’ अशी अनोखी सफर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) च्या २९ दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी अनुभवली. जिजाऊ प्रतिष्ठान व नॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही जलदुर्ग मोहीम तीन तास चालली आणि विद्यार्थ्यांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून गेली.
या उपक्रमाचे नेतृत्व जिजाऊ प्रतिष्ठानचे चंद्रकांत साटम यांनी केले. त्यांच्या २९ स्वयंसेवकांच्या सहकार्याने संपूर्ण मोहीम यशस्वीपणे पार पडली. नॅबचे शिक्षक आणि २९ विद्यार्थी शुक्रवार (ता. १४) रात्री मुंबईहून मुरुडला पोहोचले. सकाळी चहा-नाश्त्यानंतर सर्वांनी किल्ल्याकडे प्रस्थान केले. सामान्य पर्यटक ४५ मिनिटांत किल्ला पाहतात, पण या विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाऊल इतिहासाच्या स्मृतीत कोरले. वाऱ्याच्या झुळकांनी आणि तोफांच्या स्पर्शाने त्यांच्या ‘स्पर्श मोहिमेचा इतिहास’ जिवंत झाला.
या मोहिमेला केंद्र पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बी. जी. येलीकर, प्रकाश घुगरे आणि कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले. स्वयंसेवक गणेश रघुवीर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी सांभाळली. बोटीत चढणे आणि किल्ल्यावर उतरणे हे आव्हानात्मक काम त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडले. या मोहिमेत सहभागी असलेले कल्याणचे गिर्यारोहक आणि सायकलिस्ट, स्वयंमसेवक गजानन वैघ यांनी या मोहीम संदर्भात माहिती दिली.

