मुंबई विद्यापीठाकडून उत्कृष्टक्षम प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा गौरव
मुंबई विद्यापीठाकडून उत्कृष्ट प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा गौरव
मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान; कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्तीही बहाल
मुंबई, दि. १६ : मुंबई विद्यापीठातर्फे शुक्रवारी (ता. १४) शैक्षणिक आणि सह-अभ्यासक्रम उपक्रमांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या उत्कृष्ट प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने गौरव करण्यात आला. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतर्गत आणि संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता.
सर कावसजी दीक्षान्त सभागृहात आयोजित या सोहळ्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. भूषण पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते.
प्रा. भूषण पटवर्धन म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच सुरू केलेल्या उत्कृष्ट विद्यार्थी पारितोषिकाला भरभरून प्रतिसाद मिळाला, यासाठी त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेल्या पारितोषिकांनी त्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्याचा सल्ला दिला.
प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल.
विद्यापीठाने पहिल्यांदाच सुरू केलेल्या या पुरस्कारासाठी १५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. यामधून संलग्नित महाविद्यालयांतील १४८ आणि विद्यापीठ विभागातून ८४ अर्ज विचारात घेण्यात आले. पुरस्कारासाठी ठरविण्यात आलेल्या निवड निकषांतून सर्वोत्कृष्ट पुरस्कारांचे मानकरी ठरविण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. पराग काळकर, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये आणि प्रा. नितीन आरोटे यांनी काम पाहिले.
प्लॅटिनम पुरस्कारासाठी रुपये १५ हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, डायमंड पुरस्कारासाठी रुपये १२ हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि गोल्डन पुरस्कारासाठी रुपये १० हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराअंतर्गत संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली. प्रत्येकी रोख रक्कम रुपये १० हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राने विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार : विद्यार्थी, विद्यार्थिनी (कॉलेज)
प्लॅटिनम : ऋषभ कल्पेश उपाध्याय (साठ्ये महाविद्यालय), सुश्री आयशा इनायत खोत (दापोली अर्बन बँक कॉलेज)
डायमंड : तुषार हर्षकुमार शिरसाट (ठाकूर अभियांत्रिकी महाविद्यालय), किशोरी सुनील मोकाशी (एसएसटी कला आणि वाणिज्य महाविद्यालय)
गोल्डन : शिवम संतोष राय (एसएसटी कला आणि वाणिज्य महाविद्यालय), मेघना मंदार करंदीकर (विनायक गणेश वाझे महाविद्यालय)
विद्यापीठ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभागातील एकनाथ अंकुश गोपाळ (प्लॅटिनम बॉय) आणि ॲप्लाइड सायकॉलॉजी विभागातील पलक्षी जितेन शाह (प्लॅटिनम गर्ल) यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती
या पुरस्काराअंतर्गत संयोगी राजेंद्र नाईक (श्रीमती इंदिराबाई जी. कुलकर्णी कला महाविद्यालय, अलिबाग) आणि श्वेता अनिल वराडे (जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ व्यवस्थापन अभ्यास, मुंबई विद्यापीठ) यांना प्रत्येकी रोख रक्कम १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
विशेष कौतुकाचे मानकरी म्हणून बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत मार्शल आर्टस्मध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी (रौप्य पदक) श्रीया सुविधा मिलिंद साटम यांना गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

