एका महिन्यात ८,१८४ जणांवर कारवाई; ३८ लाखांचा दंड वसूल

एका महिन्यात ८,१८४ जणांवर कारवाई; ३८ लाखांचा दंड वसूल

Published on

एका महिन्यात ८,१८४ जणांवर कारवाई
मध्य रेल्वे आरपीएफकडून ३८ लाखांची दंडवसुली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ऑक्टोबर महिन्यात सुरक्षा आणि शिस्त मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली, ज्यामुळे रेल्वे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ८,१८४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ३८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे रेल्वेस्थानके आणि गाड्यांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरपीएफने आरपीएफने तंत्रज्ञान-आधारित निगराणी, कठोर गस्त, अचानक तपासण्या आणि विशेष पथकांची तैनाती केली.
मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर तसेच उपनगरी गाड्यांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले. वंदे भारत, राजधानी, मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांमध्ये नियमित एस्कॉर्टिंगची व्यवस्था केली, विशेषतः महिला, वृद्ध, दिव्यांग आणि मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.

विशेष पथकांची नजर
गर्दीच्या वेळी लोकलच्या पहिल्या आणि शेवटच्या डब्यांमध्ये होणाऱ्या ‘झटपट चोरी’च्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली. रात्रीच्या वेळेस महिला डब्यांमध्ये आरपीएफचे कर्मचारी सतत गस्त घालतात. महिला प्रवाशांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी सीएसएमटी, एलटीटी, नाशिक रोड, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, दौंड, जळगाव, बडनेरा आणि नागपूर येथे ‘मेरी सहेली’ पथके कार्यरत आहेत. या पथकांना प्रवासी महिलांच्या तक्रारी हाताळण्याचा आणि आवश्यक ती मदत देण्याचा विशेष अनुभव आहे.
-------------------
महिला सुरक्षेसाठी ‘स्मार्ट सहेली’ गट
मुंबई विभागात महिलांच्या सुरक्षेसाठी ५४ ‘स्मार्ट सहेली’ व्हॉट्सॲप गट सुरू असून, त्यामध्ये २३,३३८ महिला प्रवासी सक्रिय आहेत. या गटांमुळे महिला प्रवासी आरपीएफशी थेट संपर्कात राहतात आणि तातडीची मदत त्वरित मिळते. उपनगरी डब्यांतील सर्व ७८८ महिला कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, प्रत्येक कोचमध्ये इमर्जन्सी टॉक बॅक प्रणाली उपलब्ध आहे.
--------------------
महत्त्वपूर्ण कारवाया :
महिला डबा उल्लंघन : धारा १६२ अंतर्गत २४३ जणांवर कारवाई; ६२ हजारांचा दंड

रेल्वे मालमत्ता चोरी- : ५९ जणांवर गुन्हे नोंद; चोरीच्या वस्तूंसह ४.६२ लाखांचा दंड

बेकायदेशीर साठा :  दारू, गांजा व तंबाखूजन्य पदार्थांसह ८.२१ लाखांचा माल जप्त; १७ जणांवर गुन्हे

प्रवासी चोरी : पिशव्या, मोबाईल व इतर वस्तू चोरणाऱ्या १६१ जणांना अटक
---------------
प्रवाशांना आवाहन
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, रेल्वे परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करून प्रवाशांचा विश्वास टिकवणे हे आमचे प्राधान्य आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहील. प्रवाशांनीही कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने आरपीएफशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com