विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

Published on

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : शहरातील अनधिकृत शाळांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून शिक्षण व्यवस्थेचा पाया पूर्णपणे हादरला आहे. फेब्रुवारीमध्ये घडलेल्या एका विनयभंगाच्या गंभीर प्रकरणानंतर बदलापुरातील दहा वर्षे परवानगीशिवाय चालणारी शाळा बंद करण्यात आली. त्यानंतर स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल (बदलापूर पश्चिम), श्री चैतन्य टेक्नो स्कूल (पनवेल हायवे, बदलापूर पूर्व), तसेच अनिरुद्ध स्कूल व ज्युनिअर कॉलेज (कात्रप) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तरीही, या शाळांपैकी श्री चैतन्य टेक्नो स्कूल सुरूच असल्याने शहरात संतापाची लाट निर्माण करत आहे. शिक्षण विभाग, पोलिसांकडून गुन्हे दाखल होऊनही शाळा सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असताना शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा पालक व स्थानिकांमध्ये वाढली आहे.

फेब्रुवारीमध्ये बदलापुरातील एका अनधिकृत शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. दहा वर्षांपासून सुरू असलेली ही शाळा या प्रकारानंतर अनधिकृत असल्याचे समोर येताच ती तत्काळ बंद करण्यात आली. त्यानंतर शहरातील इतर शाळांविषयी तपासणी करण्यात आली. या तपासात अनिरुद्ध हायस्कूल-ज्युनिअर कॉलेज (कात्रप) आणि चैतन्य टेक्नो स्कूल (शिरगाव) या दोन्ही शाळा अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. शिक्षण विस्तार अधिकारी मालू शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या शाळांना नोटीस देऊन बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्यांनी वर्ग, प्रवेश प्रक्रिया, फी वसुली सुरूच ठेवली आहे. शिक्षण विभागाच्या दस्तावेजात अनधिकृत म्हणून चिन्हांकित असतानाही शाळा प्रत्यक्षात चालू आहेत, हे पालकांना धक्कादायक वाटत आहे.

पालक संभ्रमावस्थेत!
बदलापूर-अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात नव्या कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. परंतु कोणती शाळा मान्यताप्राप्त आहे आणि कोणती अनधिकृत याची माहिती पालकांना मिळत नाही. एकामागून एक शाळा अनधिकृत असल्याचे उघड होत असल्याने मुलांना कुठे प्रवेश द्यावा? कोणत्या शाळेवर विश्वास ठेवावा? पालक म्हणून मार्गदर्शन करणार कोण? अनधिकृत शाळा बंद का केल्या जात नाहीत? या प्रश्नांसमोर पालक असहाय झाले आहेत. शहरातील सर्व अनधिकृत शाळांची यादी, परवानाधारक शाळांची अधिकृत नावे आणि त्यांची मान्यता स्थिती, सार्वजनिक न केल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यासह शहरातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने फक्त गुन्हे दाखल करून न राहता प्रत्यक्षात शाळा बंद करण्याची कठोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या आहेत अनधिकृत शाळा
वांगणी येथील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, बदलापूर पश्चिमेकडील स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूल, बदलापूर पूर्वेकडील श्री चैतन्य टेक्नो हायस्कूल, अनिरुद्ध हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या अंबरनाथ तालुक्यातील अनधिकृत ठरवून गुन्हे दाखल करण्यात आलेल्या शाळा असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांनी दिली.
तसेच अनधिकृत स्थलांतर मुद्द्यावर भाल केंद्र आडवली येथील, तिसाई विद्यालय माध्यमिक विभाग व श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्राथमिक विभाग तसेच, माध्यमिक विभाग या शाळांनाही स्थलांतर मुद्द्यावर अनधिकृत ठरविल्याची माहिती पोतेकर यांनी दिली.

बदलापूर पूर्वेकडील श्री चैतन्य टेक्नो हायस्कूल शाळेला मार्चमध्येच अनधिकृत ठरवून गुन्हा दाखल केला होता. शिक्षण विभागाकडून शाळेवर एक लाख रुपये दंड व जितके दिवस शाळा सुरू आहेत त्या प्रत्येक दिवसाला दहा हजार रुपये दंड आकारला आहे. शाळा अजूनही सुरू असून या संदर्भात वरिष्ठ विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, दंडात्मक कारवाईशिवाय शाळा बंद करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरातील पालकांनी ही शाळा पूर्णपणे अनधिकृत असून, शाळेने प्रशासनाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे भविष्यात पाल्यांच्या प्रवेशावेळी शाळेच्या कागदपत्रांची पूर्ण तपासणी करूनच अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा.
- विशाल पोतेकर, गटशिक्षण अधिकारी
अंबरनाथ तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com